
कोपरगाव येथील जिल्हा सिव्हिल रुग्णालयात कोरोना तपासणीसाठी पाठविलेल्या 5 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाटे यांनी दिली. एका करोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या आठ जणांपैकी हाय रिस्क असलेल्या पाच व्यक्तींचे स्वॅब नमुने शासकीय रुग्णालय नगर येथे पाठविले होते. तर उर्वरित लो रिस्क तीन जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
कोरोना तपासणीसाठी पाठविलेल्या 5 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कृष्णा फुलसौंदर यांनी सांगितले. राहाता तालुक्यातील ममदापूर येथील कोरोनाबाधिताच्या संपर्कात ते आठजण आले होते. 25 तारखेला तो गोधेगाव येथे आपल्या 75 वर्षाच्या आजीला व मामाला भेटण्यासाठी येऊन गेला होता. त्यामुळे या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव येथील एकाच कुटुंबातील आठ जणांना एस. एस. जी. एम. महाविद्यालयातील महिला वसतीगृहातील कोरोना केंद्रात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने कोपरगावला दिलासा मिळाला आहे.



























































