कोरोनाने घेतला 50 कोटी रोजगाराचा बळी, एकटय़ा हिंदुस्थानात 2 कोटी रोजगार गेले

कोरोनाने जगभरात 50 कोटी रोजगाराचा बळी घेतला असून त्यापैकी 2 कोटी एकटय़ा हिंदुस्थानातील आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचा हा धक्कादायक अहकाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. हा आकडा केवळ संघटित उद्योगातील असून असंघटित क्षेत्राचा आकडा डोळे पांढरा करणारा असेल असे ‘सीएमआयई’ संघटनेने म्हटले आहे. कोरोना विषाणूने केलेले नुकसान हे कल्पनेच्या पलिकडचे असल्याचे या संघटनांनी म्हटले आहे.

इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन या संयुक्त राष्ट्राच्या जागतिक स्तरावर काम करणाऱया संघटनेने कोरोनामुळे रोजगारावर झालेल्या परिणामाचा अभ्यास केला. त्यात कोरोनाने केलेले नुकसान हे कल्पनेच्या पलिकडे असल्याचे संघटनेने म्हटले आहे. चालू औद्योगिक वर्षात कामाच्या तासात गेल्या वर्षीच्या तुलनेत 17 टक्के घट झाली आहे. अर्थव्यवस्था विकासाच्या वाटेवर असलेल्या देशांमध्ये रोजगाराचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. कारण या देशांमध्ये वर्क फ्रॉम होमची सुविधा कमी प्रमाणात उपलब्ध आहे.

रोजगारामध्ये प्रचंड घट झाल्यामुळे निष्क्रियतेचे प्रमाण वाढले असून औद्योगिक विकासासाठी हे मारक असल्याचे आयएलओच्या अहवालात म्हटले आहे. रोजगार गेल्यानंतर मिळणाऱया संधी कमी असल्यामुळे या क्षेत्रातून बाहेर पडणारांचे प्रमाणही वाढत आहे. रोजगाराच्या संधी वाढल्या नाही तर सामाजिक विषमता वाढण्याची भीतीही या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या