
सिंधुदुर्गमध्ये एका महिलेला झाडाला साखळीने बांधलं होतं. ही महिला 50 वर्षांची होती. महिलेकडे आधार कार्ड आणि अमेरिकेच्या पासपोर्टची झेरॉक्स कॉपी सापडली आहे. शेळी वळणाऱ्या मुलाला ही महिला दिसली. त्याने पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी या महिलेची सुटका केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोनुर्ली गावात एक मुलगा आपल्या शेळ्या चरायला नेत होता. तेव्हा त्याला दुरून कुणाचा तरी रडण्याचा आवाज आला. जवळ जाऊन पाहिलं तर त्याला धक्काच बसला. एका महिलेला लोखंडाच्या साखळीने झाडाला बांधलं होतं. नेमके किती दिवस ही महिला इथे अशा अवस्थेत होती हे कळाले नाही. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या महिलेची सुटका केली आणि सावंतवाडीच्या रुग्णालयात दाखल केले. महिलेची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना गोवा मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले आहे. या महिलेला काही मनोविकार असल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. कारण तिच्याकडे मानसिक आजाराच्या औषधांची चिठ्ठीही सापडली आहे.
या महिलेचे नाव ललिता कायी असल्याचे समजले आहे. महिलेकडे पासपोर्टची झेरॉक्स कॉपी आधार कार्ड सापडले आहे. या आधार कार्डावर तमिळनाडूचा पत्ता आहे. पोलिसांनी या प्रकरणी तमिळनाडूत संपर्क साधला आहे. महिलेच्या नवऱ्याने तिला बांधून पळ काढला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.