५० वर्षांचा मृत्युंजय

32

नमिता वारणकर,[email protected]

दानशूर, परममित्र, राधेय, सूर्यपुत्र, महाभारतातील खलनायक, कुंतीला मिळालेले वरदान अशा अनेक बिरुदावल्यांकरिता प्रसिद्ध असलेला महावीर ‘कर्ण’ त्याच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाचा, बालपणातील शौर्याचा, मित्रप्रेमाचा, कुरुक्षेत्रावरील पराक्रमाचा मागोवा घेणारी कादंबरीकार शिवाजी सावंत यांची ‘मृत्युंजय’ ही पौराणिक कादंबरी. त्यामुळेच ‘मृत्युंजय’कार सावंत म्हणून ते ओळखले जाऊ लागले. या कादंबरीच्या लेखनासाठी त्यांनी थेट कुरुक्षेत्रातच मुक्काम ठोकला होता. प्रदीर्घ संशोधन, चिंतन, मनन याद्वारे कर्णाचं मन उलगडणारी ही वास्तववादी कादंबरी. यावर आधारलेली मराठी-हिंदी नाटकंही रंगभूमीवर आली. वाचकांची निराशा दूर करणाऱया अशा या प्रभावी आणि रससंपन्न कादंबरीला नुकतीच ५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त…

कर्णाचे जीवन व्यापणाऱया ‘मृत्युंजय’ या कादंबरीविषयी लेखक शिवाजी यांच्या पत्नी आणि मृत्युंजय प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा मृणालिनी सावंत सांगतात, लहान असताना शाळेच्या नाटकात कृष्ण आणि कर्ण दोघांच्याही भूमिका सावंत करत असत. तरीही त्यांना कर्णाचे संवाद जास्त भावायचे. तेव्हापासूनच कर्ण त्यांच्या मनात होता. आज ५० वर्षांनंतरही या कादंबरीचा प्रभाव टिकून राहिलाय हेच तिचं श्रेय आहे. आयुष्यात चांगलं शिकवणारं, उभं राहायला प्रेरणा देणारं साहित्य असावं. फक्त उपदेशाचे डोस पाजणारं नसावं. निराशा झटकून या पुस्तकाने अनेकांना आयुष्यात उभं केलं. कशा प्रकारचं साहित्य लोकांपर्यंत पोहोचवायला हवं याचं कौशल्य त्यांच्याकडे होतं. म्हणून त्यांचं साहित्य एवढी वर्षे टिकून आहे आणि जोमातच आहे म्हणून अभिमानही वाटतो. लोकांना आजही अशी पुस्तकं वाचावीशी वाटतायत याचा अर्थ लोकांना आजही चांगलं आवडतंय.

एका मराठी जवानाने युद्धाच्या वेळी आपण ‘मृत्युंजय’च्या आधारावर उभं राहतो असं म्हणत पोटाच्या खिशातून या कादंबरीची प्रत काढून दाखवली. काही पोलीस अधिकारी जे ‘‘नक्षलवाद्यांशी लढताना आम्ही याच्या आधारावर उभे राहिलो’’ असंही सांगतात. जीवनात या कादंबरी वाचनातून उमेद मिळाली असे सांगणारे अनेक लोक भेटले. पुस्तक वाचून फोनवर बोलणारे, काही पत्र लिहिणारेही वाचक आहेत. ‘मृत्युंजय’मधून प्रेरणा मिळते. कशी हे नेमकं सांगता येणार नाही, पण मिळते. कारण अनेक जणांनी आयुष्यात निराशा आणि आत्महत्येच्या मार्गावर असताना ही कादंबरी वाचली त्यांना प्रेरणा मिळाली. निराशा झटकून आपण उभे राहिलो, असे अनेक वेळा सांगितले जाते. एका महाविद्यालयातील मुलाने हे पुस्तक वाचून एक पत्र लिहिलं. त्यात त्याने लिहिलं होतं, ‘‘आपण एका टोळीत समील झालो होतो. त्यावेळी ‘मृत्युंजय’ माझ्या वाचनात आलं आणि मी माझा मार्ग बदलला. नाहीतर माझ्या आयुष्याचं काय झालं असतं माहीत नाही. मी भाग्यवान होतो म्हणून मला ‘मृत्युंजय’ वाचायला मिळालं.’’ अशा प्रकारे त्यांच्या लेखणीमध्ये एवढं जबरदस्त सामर्थ्य आहे की, विरोधी मत असलेल्या व्यक्तीलाही ती आपलं मत पटवत शेवटपर्यंत घेऊन जाऊ शकते. अशा खूप प्रेरक, प्रतिकूल परिस्थितीवर मात करायला शिकवणाऱया या कादंबरीबाबत  असलेला आठवणींचा खजिनाच त्यांनी रिता केला.

एक जोशी नावाचे संशोधक अपंग असून आठ वर्षे रुग्णालयात  होते. त्यावेळी त्यांच्या सेवेसाठी असलेली नर्स त्यांना ‘मृत्युंजय’ वाचून दाखवायची. ते ऐकून आयुष्याची दिशा बदलली, असे ते म्हणतात. सावंत गेल्यानंतर एका गृहस्थाचा फोन आला. ते म्हणाले की, त्यांच्यामुळे मी पोलीस अधिकारी झालो. त्यांच्या लिखाणाच्या प्रभावामुळे मला स्फूर्ती मिळाली. एका मुस्लिम मुलीनेही ‘मृत्युंजय’ वाचून प्रेरणा मिळाल्याचं सांगितलंय.  खेळाडू, अभ्यासक, गृहिणी प्रत्येकाला प्रेरणा देतं. एका मुलाने इंग्रजी ‘मृत्युंजय’चीही मागणी केली. पुस्तक वाचून भारावणारी पत्रे आज पन्नास वर्षांनंतरही येत आहेत याचं आश्चर्य वाटतं आणि खूप आनंदही होतो, असे सांगताना त्या भारावतात.

यातील प्रत्येक व्यक्तिरेखा स्वतःचं मनोगत व्यक्त करते या वैशिष्टय़ाविषयी त्यांचं म्हणणं आहे की, दुसऱयाने सांगण्यापेक्षा  व्यक्ती स्वतःच स्वतःचं अंतरंग चांगल्या प्रकारे उलगडून सांगू शकते. म्हणून त्यांनी अशा प्रकारच्या लिखाणाची निवड केली. त्यामुळे वाचताना प्रत्येक व्यक्ती समोर उभी राहते. त्यामुळे लिहिण्याची शैली इतकी जिवंत होते की, समोरचं दृष्य पाहूनही समाधान होणार नाही यापेक्षा पुस्तक वाचताना सगळं डोळ्यांसमोर उभं राहतं. प्रत्येक व्यक्ती स्वतःबद्दल आणि दुसऱयाबद्दल जे सांगते त्यातून दोन्ही गोष्टींचा उलगडा होतो. कर्ण दुर्योधनाबद्दल तसेच दुर्योधन कर्णाबद्दल जे बोलतो ते त्यांनी प्रभावीरीत्या मांडलंय.

वाचकांना चैतन्य मिळत राहो… 

आजही या कादंबरी वाचनामुळे नव्या पिढीलाही प्रेरणा मिळते ही दिलासा देणारी गोष्ट आहे. मी त्यांना म्हणायचे की, ‘‘साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडून येण्यापेक्षा लोक तुमच्या लेखणीवर एवढं प्रेम करतात.’’ कुठल्याही पदापेक्षा  तुमच्या लेखनातून माणसांची आयुष्यं उभी राहत असतील तर बाकी सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत. त्यामुळे आज त्यांच्या लेखणीचा अभिमान आणि आनंद वाटतो. त्यातून यापुढेही बऱयाच वाचकांना चैतन्य मिळत राहो अशी इच्छा मृणालिनी सावंत व्यक्त करतात.

 

आपली प्रतिक्रिया द्या