५००० विद्यार्थ्यांनी बनविला मानवी रांगोळीचा ‘इंडियाज वर्ल्ड रेकॉर्ड’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजेश देशमाने, बुलढाणा

सकाळची ८.३० ची वेळ.. बुलढाण्यातील जिजामाता प्रेक्षागार विद्यार्थ्यांच्या उत्साहाने ओसंडून वाहत होते. मैदानामध्ये जिकडे नजर जाईल तिकडे विद्यार्थ्यांचा ओघ दिसत होता. हिरव्या, पांढर्‍या, काळ्या व केशरी रंगातील जर्सी घातलेले विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. मैदानातील या मानवी रांगोळीचे दृष्य डोळ्यात टिपण्यासाठी शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशा उत्साहपूर्ण वातावरणात ५००० विद्यार्थ्यांनी ५ मिनीटे मौन धारण करून मान झूकवुन निवडणूक आयोगाच्या बोधचिन्हाची मानवी रांगोळी साकारली. आणि एकच आवाज उठला ‘‘भारत माता कि जय…’’ विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर समाधान दिसले ते आपण देशात सर्वात मोठ्या मानवी रांगोळीचा भाग झाल्याचे व उपस्थितांच्या चेहर्‍यावर दिसले ते या दैदिप्यमान सोहळ्याचे आपण साक्षीदार झाल्याचे. या कार्यक्रमाने बुलढाण्यात एक नवा इतिहास रचला व या कार्यक्रमाची नोंद अखेर ‘इंडियाज वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये झाली.

या सोहळ्यासाठी प्रवेशद्वारावरील वरच्या बाजूला सुसज्ज व्यासपीठावर निवडणूक आयोगाचे उप मुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड, जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील- भुजबळ, इंडियाज वर्ल्ड रेकॉर्डचे मनोहर तत्ववादी आदी उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाप्रसंगी आमदार चैनसुख संचेती, नगराध्यक्षा नजमुन्नीसा मो. सज्जाद, बुलडाणा अर्बन क्रेडीट सोसायटीचे अध्यक्ष राधेशाम चांडक, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललीत वराडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पंडीत आदींसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरूवातीला एनसीसी कॅडेट्सनी जिल्हाधिकारी यांना मानवंदना दिली. तसेच सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या चित्रकला स्पर्धेतील निवडणूक व मतदार जागृती या विषयावरील उत्कृष्ट चित्रांचे अवलोकन केले.

विद्यार्थ्यांनी मानवी रांगोळी निवडणूक आयोगाच्या बोधचिन्हाप्रमाणे साकारली. या रांगोळीचर दखल इंडियाज वर्ल्ड रेकॉर्डच्या टीमने घेतली. त्यांनी संपर्ण रांगोळीचे व्हिडीओ चित्रीकरण केले. ही मानवी रांगोळी ५ मिनीटे ठेवून त्यांनी या उपक्रमाची नोंद केली. त्यानंतर निवडणूक आयागोला या उपक्रमाची नोंद घेतले असल्याबद्दलचे प्रमाणपत्र, इंडियाज वर्ल्ड रेकॉर्डचे पुस्तक भेट म्हणून देण्यात आले. यावेळी मतदार जागृती मोहिम, विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम व या उपक्रमामध्ये उत्कृष्ट काम केलेल्या विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य, महिला बचत गट, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, पतसंस्था चालक यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या उपक्रमाच्या निमित्ताने जिजामाता प्रेक्षागार येथील बाहेरील भागात जिल्हा माहिती कार्यालयाचा लोकराज्य, वन विभाग आदींचे स्टॉलही लावण्यात आले. कार्यक्रमाला विद्यार्थी, नागरीक, विविध क्षेत्रातील मान्यवर यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. संचलन अंजली परांजपे व सदानंद काणे यांनी केले. आभार उपविभागीय अधिकारी श्रीमती गोणेवार यांनी मानले. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वितेसाठी तहसीलदार सुरेश बगळे व त्यांच्या सहकार्‍यांनी अथक परिश्रम घेतले.

summary- 5000 students made human rangoli