
सामना प्रतिनिधी,ठाणे
अंबरनाथ रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षाचालकांची मोठी रांग असते. शहरात पाच हजारांहून अधिक रिक्षा असून, गेल्या काही दिवसांपासून चालकांची मनमानी सुरू आहे. अंबरनाथ शहर हे बदलापूरच्या दिशेने वाढत असून मोठय़ा प्रमाणावर बांधकामे झाली आहेत, त्यामुळे लोकसंख्यादेखील वाढली. त्या प्रमाणात रिक्षांची संख्याही वाढली असून अनेक परप्रांतीयदेखील या व्यवसायात आहेत.
लांबची भाडी नाकारणे, उलट उत्तरे देणे याविरोधात प्रवाशांनी पोलीस तसेच आरटीओकडे अनेकदा तक्रारी केल्या होत्या, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रशांत सातेरे यांनी दिली. या तक्रारींची दखल घेत आरटीओ, वाहतूक पोलीस तसेच स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे मोहीम राबवत कारवाईचा बडगा उगारला.
गणवेश घालणे सक्तीचे असतानाही काहींनी हा कायदादेखील धाब्यावर बसवला. अशा मुजोरीला पोलिसांनी ‘ब्रेक’ लावला आहे.
60 टक्के चालकांकडे लायसन्स नाही
अंबरनाथमधील 60 टक्के रिक्षाचालकांकडे लायसन्स नसल्याचे आढळून आले आहे. रिक्षाचालकांनी शिस्तीने वागावे यासाठी आरटीओ व वाहतूक पोलिसांमार्फत विशेष बैठक लवकरच घेतली जाणार आहे.































































