महापालिकेत 52 हजार कर्मचाऱ्यांची पदे रिक्त; मुंबई महापालिकेचा कारभार चालणार कसा?

तातडीने पदे भरण्याची म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची मागणी
दीड कोटी मुंबईकरांना सोयीसुविधा उपलब्ध करून देणाऱया मुंबई महापालिकेत विविध विभागांतील तब्बल 52 हजार 221 पदे रिक्त आहेत. मुंबई महापालिकेचा कारभार हाकण्यासाठी 1 लाख 45 हजार कर्मचाऱयांची गरज असताना पालिकेचे फक्त एक लाख कर्मचारी अतिरिक्त कामाचा तणाव झेलत काम करत आहेत. त्यामुळे ही रिक्त पदे तातडीने भरा, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने पालिका आयुक्तांकडे केली आहे.

मुंबई शहर व उपनगरातील सुमारे दीड कोटी जनतेला नागरी सेवा पुरवण्याचे काम मुंबई महापालिका अहोरात्र करीत असते. त्यासाठी 129 विविध खाती-विभाग कार्यरत असून त्यातील काही खाती/विभाग अत्यावश्यक सेवेत मोडतात. नागरी सेवा पुरवण्यासाठी मुंबई महापालिकेने कर्मचाऱ्यांची 1 लाख 45 हजार 111 इतकी शेडय़ुल्ड पदे निर्माण केली होती. मुंबई शहराची वाढत्या लोकसंख्येमुळे नागरी सेवा पुरवण्यासाठी वेगवेगळी अतिरिक्त खाती व काही विभाग महापालिकेने सुरू केले आहेत. मात्र, त्या ठिकाणी लागणारे मनुष्यबळ नव्याने भरती केले नाही. इतकेच नाही तर सेवानिवृत्ती, निधनामुळे रिक्त होणारी कर्मचाऱयांची अनुसूचित जाती-जमातींसाठी असलेली राखीव पदे अनेक वर्षे भरली गेली नाहीत. त्यामुळे सुमारे 52 हजार 221 पदे रिक्त असल्याची माहिती आरटीआयमधून समोर आली आहे.

सेवानिवृत्तीमुळे आणखी ताण वाढणार
महापालिकेच्या विविध विभागांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी 2024-25 सालामध्ये मोठय़ा संख्येने कर्मचारी निवृत्त होणार आहे. त्यामुळेही उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढणार आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करा, तातडीने पदे भरा!
कर्मचाऱ्यांअभावी कार्यरत कर्मचाऱयांना अतिरिक्त काम करावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्यावरील कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे कंत्राटी पद्धत रद्द करा, अनेक वर्षे काम करत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करा, रिक्त पदांसह अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव असलेली पदे तातडीने भरा, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम आणि उपाध्यक्ष संजय कांबळे-बापेरकर यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.