
मुंबईतील उद्योजक व पारनेर तालुक्यातील जामगावचे रहिवासी सुरेश धुरपते यांच्या आलिशान गाडीतून बुधवारी मध्यरात्री तब्बल 55 लाख रुपयांची रोख रक्कम चोरीस गेली. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धुरपते मंगळवारी रात्री मुंबईहून जामगाव येथे आपल्या खासगी चारचाकीने आले. घरी पोहोचल्यानंतर त्यांनी चालकाला गाडीतील कपड्यांची बॅग घरात ठेवण्यास सांगितले. एका बॅगमध्ये 55 लाखांची रोकड होती. ती बॅग मात्र मोटारीतच ठेवण्यास धुरपते यांनी चालकास सांगितले. रात्री उशिरा धुरपते हे घराबाहेर आले असता त्यांच्या गाडीच्या मागील बाजूची काच फुटलेल्याचे दिसले. त्यांनी मोटार उघडून पाहिले असता 55 लाखांची रोकड असलेली बॅग तेथे नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.
बुधवारी मध्यरात्री धुरपते सहाकाऱ्यांसह पारनेर पोलीस स्टेशनला पोहोचले. रक्कम चोरीस गेल्याची फिर्याद दाखल केली. मात्र रकमेचा तपशील धुरपते यांना तात्काळ देता आला नाही. रक्कम कोठून आणली, कशासाठी आणली ते सांगण्यासही त्यांनी असमर्थता दर्शविली. आर्थिक गोपनीयतेचे कारण त्यांनी पुढे केले. त्यामुळे फिर्याद कशी दाखल करणार हा प्रश्न निर्मिती झाला.


























































