जालन्यात 6 लाखांच्या दारूसाठ्यासह पिकअप सोडून चालक पसार

769

जालना शहरातील मंठा चौफुली परिसरातून विदेशी दारूचा साठा अवैधरित्या विक्रीसाठी घेऊन एक पिकअप टेम्पो जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलिसांना याबाबत कारवाईच्या सूचना दिल्या. पोलिसांचे पथक पाहताच पिकअप चालक मंठा चौफुली परिसरातील पुष्पकनगर भागात घुसला. त्याठिकाणी टेम्पो सोडून चालक पसार झाला.

पोलिसांनी टेम्पोची झडती घेतली असता त्यामध्ये 6 लाख 92 हजार 800 रुपयांचे मॅकडोल नंबर-1 दारूचे 124 बॉक्स, 1 लाख 53 हजार 600 रुपयांचे ब्लेंडर्स प्राईड दारूचे 10 बॉक्स, 17 हजार 500 रुपयाचे 100 पायपर्स ब्लेंडर्स स्कॉच व्हिस्कीच्या 5 बॉटल्स, 5 हजार रुपयाची व्हाईट लेबल्स ब्लेंडर्स स्कॉच व्हिस्कीच्या 2 बॉटल्स, 11 हजार रुपयांच्या चिवास रिगल (12) ब्लेंडर्स स्कॉच व्हिस्कीच्या 5 बॉटल्स, असा एकूण 10 लाख 79 हजार रुपयांचा विदेशी दारूचा साठा आणि 4 लाख रुपये किमतीचे पिकअप टेम्पो असा 14 लाख 79 हजाराचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात सहायक फौजदार मोईन फॅक्रोद्दीन खान यांच्या तक्रारीवरून टेम्पोच्या अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या