धाराशिवमध्ये सहा नवे रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या 35 वर

592

धाराशिव जिह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत 6 ने वाढ झाली आहे. जिह्यात सध्या कोरोनाचे 35 रुग्ण असून त्यातील 6 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. रविवारी 47 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी लातूर येथील विलासराव देशमुख विज्ञान संस्थेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यापैकी 35 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये उमरगा तालुका 3 (उमरगा शहर-2, केसरजवळगा-1), परंडा तालुका 1 (उकडगाव), धाराशिव तालुका 2 (धाराशिव शहर 1, धुत्ता 1) येथील रुग्णांचा समावेश आहे. धाराशिव शहरातील जोशी गल्लीतील एक युवक सोलापूर येथून आला आहे. तसेच तालुक्यातील धुत्ता येथील एका मुंबईहून परतलेल्या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

उमरगा शहरात काही दिवसांपूर्वी मुंबई येथून आलेल्या महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे निदर्शनास आले होते. महिलेच्या संपर्कातील एका पुरुषाचा स्वॅब पॉझिटिव्ह आला. तसेच उमरगा येथे सहा दिवसांपूर्वी विवाह झाला होता. यामध्ये नववधूचा काका सोलापूर येथून आला होता. त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले होते. त्याच्या संपर्कातील एका पुरुषाचा स्वॅब पॉझिटिव्ह आला. केसरजवळगा (ता. उमरगा) येथील एका मुंबई रिटर्न महिलेला बाधा असल्याचे आढळून आले. तसेच परंडा तालुक्यातील कुक्कडगाव येथील बाधिताच्या संपर्कातील एक पॉझिटिव्ह असल्याचे समजते. जिह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 35 वर गेली असून यातील 6 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. उर्वरित 29 रुग्णांवर जिह्यात विविध शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या