आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात पुन्हा ६० लाखांचा घोटाळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्रामीण भागांतील लाभार्थींच्या निधीवर तब्बल ५९ लाखांचा डल्ला मारल्याचे उघड झाले आहे. लाभार्थींना देण्यात येणारे साहित्याचे वाटप न करता त्याची रक्कम परस्पर हडप करण्यात आल्याचे चौकशी समितीत उघड झाले. याच कार्यालयात तीन महिन्यांपूर्वीच विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाच्या नावाखाली १५ लाखांचा घोटाळा उघडकीस आला होता. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिडको एन- ८ भागात असलेल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय हे घोटाळ्याचे माहेरघर बनले आहे. या कार्यालयात शासनाने राबविलेल्या योजना लाभार्थींना न देता त्याची रक्कम अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परस्पर खिशात घातल्याचे उघड झाले आहे. प्रकल्प अधिकारी दिलीप देशमुख याने २००४ ते २००९ या कालावधीत पदावर कार्यरत असताना आदिवासी विभागाच्या विविध योजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करून त्याचा लाभ लाभर्थींना देण्याचे त्यांचे प्रमुख काम होते. परंतु, त्यांनी पदाचा गैरवापर करीत एच.डी. पाईप, सायकर, थ्रेशर मशीन, शिलाई मशीन, कृषी अवजारे याचे लाभार्थींना वाटप न करता त्याची रक्कम परस्पर हडप केली. तसेच त्याचे रेकॉर्डदेखील ठेवले नाही. दरम्यान, या प्रकरणी अनेक लाभार्थींनी तक्रारी केल्यावर शासनाने उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्या. एम.जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. समितीने सखोल चौकशी केली असता दिलीप देशमुख व त्यांच्या कार्यालयातील इतर कर्मचारी, अधिकाऱ्यांनी लाभार्थींना अवजारे वाटप न करता टप्प्याटप्प्याने २००४ ते २००९ यादरम्यान पैसे काढून शासनाची तब्बल ५९ लाख ३० हजार १७२ रुपयांची फसवणूक केल्याचा अहवाल दिला. यावरून प्रकल्प अधिकारी दिलीप खोकले यांनी सिडको ठाण्यात दिलीप देशमुखविरुद्ध फसवणुकीची तक्रार दिली. तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात दिलीप देशमुख व त्यांच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीन महिन्यांपूर्वीच १५ लाखांचा घोटाळा
जानता राजा मल्टिर्पज चॅरिटेबल ट्रस्टने ३ जुलै २०१५ ते १३ मे २०१६ दरम्यान तरुणांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण दिले. ट्रस्टने शेकडो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण दिलेल्या तरुणांची संख्या आणि नोकरीला लावलेल्या तरुणांच्या संख्येत तफावत असल्याचे उघड झाल्याने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहायक प्रकल्प अधिकारी दिलीप नारायण खोकले यांनी सखोल चौकशी केली असता त्यांना जानता राजा मल्टिर्पज चॅरिटेबल ट्रस्टने बनावट आणि खोटी कागदपत्रे सादर केल्याची समोर आले. ट्रस्टचा पहिला धनादेश हा ४० टक्के रकमेचा काढण्यात आला. त्यानंतर पुन्हा ४० टक्के आणि नंतर २० टक्के असे वर्षभरात १५ लाख रुपये काढण्यात आले. या प्रकरणीही सिडको पोलीस ठाण्यात १२ एप्रिल २०१८ ला गुन्हा दाखल करण्यात आला होता. घोटाळ्याचा सलग दुसरा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.