
भोंदूबाबा अशोक खरातने नाशिकसह सिन्नर, शिर्डी, राहता, पाथर्डी, निघोज, निमगाव कोऱहाळे आणि परिसरात शेकडो कोटी रुपयांच्या जमिनी व भूखंडांचे मोठे जाळे उभारल्याचे उघड झाले असून, आतापर्यंत 60 हून अधिक सातबारा उतारे हाती लागले आहेत.
भोंदूगिरीच्या आडून खरातने जमीन खरेदी-विक्रीचाही मोठा व्यवसाय चालविल्याचे समोर आले आहे. स्वतःची आंतरराष्ट्रीय प्रतिमा तयार करण्यासाठी त्याने 100 हून अधिक देशांचा दौरा केल्याचीही चर्चा आहे. नाशिक शहरातील कर्मयोगीनगर भागात त्याचा आलिशान बंगला असून, शरणपूर रोडसारख्या महागडय़ा परिसरात कार्यालय आहे.
महापालिका हद्दीतील पाथर्डी, विल्होळी आणि गौळाणे भागांत खरात कुटुंबीयांची मोठी गुंतवणूक आढळून आली आहे. या परिसरात जवळपास 16 भूखंड आणि सुमारे सहा एकर शेतजमीन असल्याची माहिती पुढे आली आहे. आडगाव येथेही स्वतंत्र भूखंड खरेदी करण्यात आला आहे.
सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे खरातने ईशानेश्वर मंदिर उभारून त्याच्या शेजारी फार्महाऊस आणि आंब्याची बाग विकसित केली. येथे त्याच्या नावावर 21 एकर शेतजमीन आहे.
रूपाली चाकणकर यांना अटक करण्याची मागणी
राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर राज्यातील कथित सेक्स रॅकेटमध्ये सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून चाकणकर यांना या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी केली आहे.


























































