‘पंतप्रधान मुद्रा लोन’ मिळवून देण्याच्या नावाखाली महिला बचतगटातील सुमारे 600 महिलांची फसवणूक करण्यात आली आहे. फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये महिलांनी याबाबत फिर्याद दिली असून, फसवणूक करणारी महिला ज्योती रमेश कांबळे ही फरार झाली आहे. यामध्ये शहरातील जवळपास 600 ते 700 महिलांची 22 लाखांची फसवणूक केल्याची चर्चा आहे.
ज्योती कांबळे ही ग्रामीण भागात राहणारी असून, शहरातील विविध भागात राहणाऱया आणि चौकस बुद्धीच्या महिलांनाच तिने गंडविल्याने चर्चेचा विषय झाला आहे. फसवणूक झालेल्या महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ‘लखपती दीदी’ योजनाच आहे असे समजून अर्जासाठी प्रत्येकी साडेतीन हजार आणि कागदपत्रांच्या झेरॉक्स दिल्या. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. सध्या ‘लाडकी बहीण योजनेबाबत अनेक तक्रारी सुरू असताना आता मोदींच्या ‘लखपती दीदी’ योजनेने महिलांना हवालदिल केले आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील तळेहिप्परगे येथे राहणाऱया ज्योती रमेश कांबळे हिने पंतप्रधान मुद्रा योजनेतून गृहउद्योगाकरिता एक लाख रुपये मिळवून देते, असे सांगत महिलांना बचतगट स्थापण्यास सांगितले व काही बचतगटातील महिलांना अवघ्या 15 दिवसांत मुद्रा लोन मिळवून देण्याचे आश्वासन देत आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक घेतले. यावेळी प्रत्येक अर्जासोबत साडेपाच हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगून त्यातील 3000 रुपये घेतले व उर्वरित रक्कम मुद्रा लोन मंजूर झाल्यानंतर देण्याचे ठरले. कांबळे हिने सोलापुरात जानेवारी 2024 पासून हा प्रकार सुरू केला होता.
ऑक्टोबर उजाडला तरी मुद्रा लोन न मिळाल्याने महिलांमध्ये चर्चा सुरू झाली. शहरातील अनेक भागातून कांबळे हिने महिलांकडून रक्कम उकळली असून, ती 22 लाखांच्या पुढे गेली आहे. याप्रकरणी शुभांगी धनंजय गायकवाड (रा. कोणार्कनगर, जुळे सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
बचत गटाच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांना भेटवस्तूंचे अमिष
कांबळे या महिलेने मुद्रा योजनेंतर्गत माहिती देताना एक लाख रुपयांच्या कर्जापोटी महिन्याला फक्त एक हजार रुपयांचा हप्ता, 25 हजार रुपयांची सबसिडी असून, फक्त 75 हजार रुपयेच फेडावे लागतील, असे सांगितले. ज्या बचत गटातील महिलांची संख्या जास्त सहभागी होईल, त्या बचतगटाच्या अध्यक्षांना वॉशिंग मशिन व उपाध्यक्षांना घरगुती पिठाची चक्की भेट देणार असल्याचे सांगितल्याने महिलांचा अधिक विश्वास बसला.