भायखळा आणि धारावी परिसरात 63 लाखांची बेहिशेबी रक्कम जप्त

प्रातिनिधिक फोटो

विधानसभा निवडणुकीच्या प्रचार काळात बेहिशेबी रकमेच्या व्यवहारावर निवडणूक आयोगाने लक्ष केंद्रित केले असून आज सकाळी एका होंडा सिटी मोटारीतून 4 लाख 51 हजारांहून अधिक बेहिशेबी रक्कम जप्त केली तर गुरुवारी भायखळ्यात बोलेरो कारमधून 58 लाखांहून अधिक रोख रक्कम जप्त केली. निवडणूक आयोगाच्या पथकाने या दोन्ही मोटारीतून एकूण 63 लाख 9 हजार 755 रुपयांची बेहिशेबी रक्कम ताब्यात घेतली आहे.

आज शीव जंक्शनकडून एलबीएस रोडने कुर्ल्याच्या दिशेने जाणारी होंडा सिटी मोटारीची तपासणी केला असता मोटारीमध्ये ही रक्कम आढळून आली. याबाबत धारावी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर भायखळा विधानसभा मतदारसंघात के. के. टॉवरच्या समोर, के. के. रोड येथे गुरुवारी सायंकाळी मोटार क्रमांक (एमएच 46 बीएफ 9849) या पांढऱया रंगाची बोलेरो जीपची निवडणूक आयोगाच्या तपासणी पथकाने तपासणी केली असता आतमध्ये 58 लाख 58 हजार 15 रुपये इतकी रक्कम आढळून आली. ही रक्कम आग्रीपाडा पोलीस ठाण्यात जमा केली असून आयकर विभाग कार्यालयाला कळविण्यात आले आहे, अशी माहिती भायखळा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक क्षीरसागर यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या