लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्यवस्थापकाच्या गाडीतून 7 लाख पळवले

73

सामना प्रतिनिधी । निलंगा

निलंगा येथील लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा निलंगा यांच्या अंतर्गत तालुक्यातील बोरसुरी शाखेचे शाखा व्यवस्थापक धनगड बी. एन. यांच्या गाडीतून सात लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी पळवले. कासारशिरसी रस्त्यावर ज्यूस सेंटरजवळ ज्यूस घेण्यासाठी थांबले असता त्यांच्या मोटरसायकलच्या डिक्कीतून अज्ञात चोरट्यांनी पैसे पळवल्याची घटना घडली.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, निलंगा शहरातील बिदर रोडवर असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत नेहमीप्रमाणे बोरसुरी शाखेतील शाखा व्यवस्थापक धनगड बी. एन. आपल्या सहकाऱ्यासोबत येऊन बोरसुरी,तालुका निलंगा शाखेसाठी पाचशे रुपयाची दहा बंडल असे पाच लाख, दोनशे रुपयाचे दहा बंडल असे दोन लाख, असे एकूण सात लाख रुपये आपली मोटरसायकल MH24-p6698 च्या डिग्गीत घालून बँकेतून बोरसुरी कडे जात असताना वाटेत कासारशिरसी मोडवर ज्यूस सेंटर वर थांबून ज्यूस घेऊन निघाले. यानंतर बोरसुरी गावाजवळ लघुशंकेसाठीही थांबले. बोरसुरी शाखेत जाऊन मोटरसायकलचे डिकी उघडली असता पैसे गायब झाले असल्याचे दिसले. यामुळे घाबरून जाऊन शाखा व्यवस्थापक धनगड यांनी झालेला प्रकार लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक यांना झालेल्या घटनांची माहिती दिली. त्यानंतर निलंगा पोलीस ठाण्यात धनगर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय निलंगे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या