
राज्यातील अनेक खासगी आणि सरकारी रक्तपेढय़ांमध्ये वार्षिक रक्तसंकलन चांगले होत आहे. परंतु सुमारे 6 ते 7 टक्के रक्तपेढ्या रक्तसंकलनात अजूनही मागे आहेत. जास्तीत जास्त रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून रक्तसंकलन वाढवण्याच्या दृष्टीने या रक्तपेढय़ांनी प्रयत्न करायला हवेत, अशी माहिती राज्य रक्त संक्रमण परिषदेतील सूत्रांनी दिली.
वर्षाला किमान दोन हजार युनिट रक्त संकलित करण्याच्या नियमांचे पालन करण्याचे आदेश राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने रक्तपेढय़ांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य रक्त संक्रमण परिषदेतील सूत्रांशी संपर्क साधला असता त्यांनी मुंबईसह राज्यभरात रक्तसंकलन चांगल्या पद्धतीने होत असल्याचे सांगितले. किमान रक्त संकलित करण्याच्या नियमांचे रक्तपेढय़ांकडून उल्लंघन होत आहे हे लक्षात घेऊन राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने वर्षाला दोन हजार युनिट रक्त संकलित करण्याचे आदेश दिले असून रक्त वाया जाऊ नये यासाठी मोठी शिबिरे घेऊ नयेत, असेही परिषदेने बजावल्याचे समोर आले आहे. मात्र मुंबईसह राज्यभरात रक्ताची गरजही मोठी आहे. त्यामुळे रक्त वाया जाण्याचा प्रश्नच येत नाही, असा दावा सूत्रांनी केला.
मुंबईत 7 हजार 668 युनिट्स रक्तसाठा
मुंबईत सध्या 7 हजार 668 युनिट्स रक्तसाठा असून राज्यात 43 हजार 480 युनिट्स इतका रक्तसाठा आहे. मुंबईची दिवसाची गरज 800 युनिट्स इतकी आहे. हे लक्षात घेता सध्या उपलब्ध असलेला रक्तसाठा पुरेसा आहे. तसेच विविध ठिकाणी आयोजित रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर रक्त संकलित होत आहे. दरम्यान, ज्या रक्तपेढय़ांकडून कमी रक्त संकलित होत आहे त्यांना विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने महाविद्यालये, कार्यालये येथे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे आवाहनही करण्यात आल्याचे राज्य रक्त संक्रमण परिषदेने स्पष्ट केले आहे.