‘हरिहर’वर चढाई करणार्‍या 70 वर्षांच्या आजींनी कोरोनाची लढाईही जिंकली!

वर्षभरापूर्वी खडतर असा हरिहर गड चढून नाशिकच्या आशाबाई अंबाडे यांनी सर्वांनाच थक्क केले. हाच मनाचा खंबीरपणा, कमालीची सकारात्मकता त्यांना कोरोनाशी लढतानाही उपयोगात आली. ऑक्सिजनची पातळी 88 पर्यंत खाली उतरली, तरीदेखील योग्य उपचारानंतर पाचव्याच दिवशी कोरोना हरला आणि 70 वर्षांच्या या आजी जिंकल्या.

कोरोनावर विजय मिळवणाऱ्या या आजींचे नाव आशाबाई शांताराम अंबाडे असे आहे. त्यांची मुले मनोज आणि संजय यांना ट्रेकिंगची आवड आहे. त्यांच्यासोबत मागील वर्षी आशाबाईंनी न थकता हरिहर गडावर चढाई केली. विशेष म्हणजे चढताना तासभर जंगल तुडवत वाट काढावी लागते. पुढे दोन मोठ्या खडकांवरील चढाई मोठी अवघड आहे. तरीही दोन तासात त्यांनी गड सर केला होता.

जुनी मॅट्रिक झाल्यानंतर त्या काही वर्षे मालेगावात शिक्षिका होत्या. लग्नानंतर शेती आणि शिकवणी असा त्यांचा दिनक्रम होता. आता त्यांनी सत्तरीत पदार्पण केले आहे. 20 मार्चला कोरोनावरील लस घेतल्यानंतर त्यांना ताप आला. दुसर्‍या दिवशी तो उतरला. पण, चौथ्या-पाचव्या दिवशी पुन्हा जाणवू लागला. सोबत अंग आणि डोकेदुखीही होती. ही कोविडसारखी लक्षणे असल्याचा मुलांना संशय आला.

मुलगा संजय आणि त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली. पुढे एक-एक करत कुटुंबातील नऊजणांना कोरोनाची लागण झाली, असे अॅड. मनोज अंबाडे यांनी सांगितले. सुरुवातीला त्यांच्यावर गृहविलगीकरणातच फॅमिली डॉक्टरांकरवी उपचार सुरू होते. एचआरसीटी स्कोअर 7 आणि ऑक्सिजन लेव्हल 95-96 होती. मात्र, पाच दिवसांनीही प्रकृती सुधारली नाही. ऑक्सिजनची पातळी 90 च्या खाली उतरली, म्हणून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दिवस ऑक्सिजन दिल्यानंतर तिसर्‍या दिवशी लेव्हल सुधारली आणि पाचव्या दिवशी त्यांना डिस्चार्ज मिळाला.

उपचारांना कंटाळल्या नाहीत
चौथ्या दिवशीच आपल्याला ऑक्सिजनची गरज नाही, आयसीयूत जावे लागणार नाही, असे त्यांनी ठामपणे डॉक्टरांना सांगितले. उपचारांना त्यांनी चांगला प्रतिसाद दिला, असे सांगत डॉक्टरांनी त्यांचे कौतुक केले.

इच्छाशक्तीमुळेच नऊजण कोविडमुक्त
आशाबाई यांची दोन्ही मुले, दोन सुना, चार नातवंडे सर्व कोरोनाबाधित झाले होते. आशाबाई वगळता इतर सगळे घरीच उपचार घेत कोविडमुक्त झाले. रुग्णालयातून त्या घरी आल्या, तो अंबाडे कुटुंबीयांसाठी आनंद सोहळा होता.

आपली प्रतिक्रिया द्या