सौदी अरेबियाच्या तुरुंगात अडकलेले 700 कामगार मायदेशात परतले

कोरोना लॉकडाऊनमुळे सौदी अरेबियातील जेद्दाह शहरातील तुरुंगात गेल्या चार महिन्यांपासून अडकलेले 700 कामगार अखेर मायदेशात परतले आहेत. ‘मसाला किंग’ डॉ. धनंजय दातार यांनी या कामगारांना मायदेशात परतण्यासाठी आवश्यक असणारे सर्व प्रकारचे सहकार्य केले.

सौदी अरेबियामध्ये कामासाठी गेलेले हे हिंदुस्थानी कामगार कोरोना साथ व लॉकडाऊनमुळे अडकून पडले होते. यातील काहींच्या व्हिसाची मुदत संपली होती. काहींनी नोकऱ्या गमावल्याने ते अन्यत्र मिळेल ते काम करुन गुजराण करत होते. तर काही जणांकडे उपजीविकेचे काहीच साधन नसल्याने त्यांच्यावर अक्षरशः भीक मागण्याची वेळ आली होती. मात्र या गोष्टी स्थानिक कायद्याला धरुन नसल्याने सौदी पोलिसांनी त्यांची रवानगी स्थानबद्धता केंद्रात (डिटेन्शन सेंटर) केली होती. तुरूंगवासातून सुटका होऊन मायदेशी परतण्यासाठी हे कामगार व्याकुळ झाले होते. याची माहिती मिळताच डॉ. धनंजय दातार यांनी तातडीने कार्यवाही करून या कामगारांना हिंदुस्थानात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. डॉ. दातार यांनी दुबईतील हिंदुस्थानी वाणिज्य दूतावासामार्फत जेद्दाहमधील हिंदुस्थानी वाणिज्य दूतावासाशी संपर्प साधला आणि स्थानिक प्रशासनाने मानवतावादी भूमिकेतून या निरपराध कामगारांना तुरूंगवासातून सोडल्यास सर्वांना हिंदुस्थानात नेण्याचा पूर्ण खर्च उचलण्याची तयारी दाखवली.

आपली प्रतिक्रिया द्या