अनेक प्रकारचे काँक्रिट, कोल्डमिक्स आणि इतर अत्याधुनिक उपाययोजना करण्यासाठी दोन वर्षांत पालिकेने दर्जेदार रस्त्यांसाठी तब्बल 725 कोटी रुपये खर्च केले असताना अजूनही रस्त्यांवरील खड्डय़ांची स्थिती जैसे थेच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मुंबईकरांना खड्डेमुक्त रस्ते मिळून प्रवास सुखकर कधी होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत सुमारे दोन हजार कि.मी.चे रस्ते आहेत. या रस्त्यावरून मुंबईकरांचा प्रवास सुखकर होण्यासाठी सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे धोरण पालिकेने आखले आहे. यात 25 ते 30 टक्के रस्त्यांची कामे झालीही आहेत. मात्र नियोजनाअभावी हाती घेतलेल्या शिल्लक रस्त्यांची 20 टक्केही कामे पूर्ण झाली नसल्याने मुंबईकरांना खड्डय़ांचा सामना करावा लागत आहे. गेल्या वर्षीही पावसाळ्यापूर्वी खड्डेमुक्त रस्त्यांसाठी पालिकेने 225 कोटी रुपये तर मास्टिक अस्फाल्टद्वारे रिसरफेसिंगद्वारे रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी सुमारे 200 कोटी असे एकूण 425 कोटी रुपये खर्च केले. तर यंदाच्या पावसाळ्यात खड्डेमुक्त रस्त्यांसाठी 300 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. म्हणजेच दोन वर्षांत सुमारे सवा सातशे कोटी रुपये खर्च करूनही रस्ते मात्र सुस्थितीत नसल्याचे चित्र दिसत आहे. मुंबईत सद्यस्थितीत शहर भागात 24 ठिकाणी तसेच पूर्व उपनगरात 32 ठिकाणी तर पश्चिम उपनगरात 87 ठिकाणी कामे सुरू आहेत.
असे होतेय काम
– मुंबई महानगरपालिकेने विविध रस्त्यांच्या दुरुस्तीयोग्य ठिकाणी (बॅड पॅच) मास्टिक अस्फाल्टद्वारे डागडुजीकरणाची कामे हाती घेतली आहेत. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे (झ्दूप्दते) दुरुस्ती कामांसाठी महापालिकेच्या वतीने 7 परिमंडळांत एकूण मिळून 14 कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे.
– सात परिमंडळांमध्ये प्रत्येकी दोन कंत्राटदारांची नेमणूक केली असून 9 मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांसाठी स्थानिक वॉर्डच्या पातळीवर आणि 9 मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यासाठी रस्ते विभागाच्या अखत्यारित अशा प्रकारे स्वतंत्र कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे.
– यामध्ये प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीत 9 मीटरपेक्षा मोठय़ा रुंदीच्या मार्गावरील रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीसाठी प्रती विभाग कार्यालय 10 कोटी रुपये आणि 9 मीटरपेक्षा कमी रुंदीच्या मार्गासाठी सुमारे दीड कोटी रुपये या प्रकारे सुमारे 275 कोटी रुपये खड्डे आणि खराब रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी खर्च करण्यात येत आहेत.