आत्मानुभव – ज्ञानराज माझी योग्यांची माऊली

>> डॉ. सुनीलकुमार सरनाईक

शनिवार दिनांक 3 मे ते शनिवार दिनांक 10 मेश्रीसंत ज्ञानेश्वर महाराज यांचा 750 वा जन्मोत्सव (सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव) श्रीक्षेत्र आळंदी देवाची येथे संपन्न होत आहे, त्यानिमित्ताने

ग्रंथ थोर ज्ञानदेवी।

एक तरी ओवी अनुभवावी।।

हे संतश्रेष्ठ नामदेवरायांनी वर्णिलेले शब्द नित्य मनन करण्यासारखे आहेत. अर्जुनाला निमित्त करून भगवंतांनी कुरूक्षेत्रावर सर्व जगाला गीतेच्या रूपाने कर्तव्यपारायणता आणि मानवता धर्म शिकवला. तेच ईश्वरी कार्य माऊली ज्ञानदेवांनी संस्कृत भाषेतील गीता प्राकृत भाषेत आणून परिपूर्ण केले. तत्कालीन समाज कर्मकांडाने आणि स्वार्थांधाने बुजबुजलेला व बुरसटलेला होता. ज्ञानेश्वरादी चारी भावंडांना समाजात कोठेही आसरा नव्हता. ज्या समाजाने पदोपदी त्यांची अवहेलना केली, त्याच समाजात त्यांनी नवचैतन्य निर्माण करून त्याला आत्मोद्धाराची अमृत संजीवनी दिली.

प्रचंड हाल-अपेष्टांच्या भयानक वणव्यात होरपळून निघालेले ज्ञानदेव स्वतसाठी मात्र भगवंताकडे काहीही मागत नाहीत, हे लक्षात घेण्यासारखे आहे. ‘सर्वांचे सर्वकाली अन् सर्वप्रकारे निरंतर कल्याण व्हावे’ हीच एकमेव त्यांची मनोधारणा आहे आणि याच एका निरपेक्ष उद्देशाने त्यांनी आपले तन-मन-धन जनताजनार्दनाच्या चरणी समर्पित केले. ज्ञानदेवांनी मानवतेच्या कल्याणासाठी ‘ज्ञानेश्वरी’मध्ये ‘पसायदान’ मागितले आहे. त्यांनी सामाजिक समतेचा पुरस्कार करणाऱया वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली. सर्व जाती-धर्मांना एका सूत्रात बांधणाऱया भागवत धर्माचा पाया घातला. त्यांनी लिहिलेल्या अलौकिक अशा ‘भावार्थ दीपिका तथा ज्ञानेश्वरी’मुळे मराठी वाङ्मयात मोलाची भर पडली. मराठमोळय़ा संस्कृतीत ‘ज्ञानेश्वरी’ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच भागवत धर्मीय ‘ज्ञानाचा ईश्वर तो ज्ञानेश्वर’ असे म्हणतात. ‘ज्ञानेश्वरी’च्या माध्यमातून त्यांनी मराठी मनाला ‘अमृताची पाऊलवाट’ दाखवून दिली आहे. ती कितीही वेळा वाचली तरी प्रत्येक वेळी तिचा नवनवीन अर्थ उलगडला जातो.

महाराष्ट्रीय साधना सांप्रदायाच्या इतिहासाचे ‘सुवर्णा’चे पान म्हणजे ‘श्री ज्ञानेश्वरी’ होत. ज्ञानभक्तीचे परमरहस्य ‘ज्ञानेश्वरी’त सापडते. अमृताच्या वेलीला अमृताची फळे लावण्याची किमया ‘ज्ञानेश्वरी’तून साधली आहे. ‘ज्ञानेश्वरी’मध्ये प्रज्ञान आणि ललित्य यांचा मनाला मोहून समन्वय दिसतो. ‘अमृतातेही पैजा जिंकणाऱया’ मराठीतील हे अक्षर वाङ्मय म्हणजे रसाळ, सुगंधी, अर्थवाही, मधुर आणि खरा जीवनानंद देणारे तत्त्वज्ञानाने भरलेले पंचपक्वान्नांचे ताट आहे.

त्यातील प्रत्येक ओवी सुख-शांतीचा सोपान आहे. संसारातील दुःखावरील रामबाण इलाज आहे, तर तृषार्थ साधकांसाठी पर्जन्याचा वर्षाव आहे. जातिभेदाचे उच्च-नीचतेचे समूळ उच्चाटन तिच्यातून झाले आहे. सर्वांभूती ममत्वाची भावना तिच्यात आहे. भेदाभेद, द्वैतभाव तिच्यात नाही. सकल मानवतेच्या, विश्वाच्या कल्याणासाठी त्यांनी प्रत्येक ओवीची रचना केली आहे.

सर्व प्राणिमात्रांत सूर्याने उजळून उदय होवो, सर्व विश्व स्वधर्मरूपी सूर्याने उजळून निघो. सर्व प्राणिमात्रांची इच्छा पूर्ण होवो. सर्व मांगल्याचा विश्वावर सतत वर्षाव करणारे संतजन प्रकट होत राहोत. वाईट अधर्मीचा कुटिलपणा व विषवल्ली नाहीशी होऊन त्यांच्यामध्ये सत्कर्माबद्दल प्रेम व्हावे व ते सतत वृद्धिंगत व्हावे, पापरूपी अंधकाराचा नायनाट व्हावा. सर्वांना ऐहिक व पारमार्थिक सुख लाभावे, अशी मनापासून प्रार्थना ‘ज्ञानियांचा महाराव’ ज्ञानदेवांनी भगवंताला ‘पसायदान’मधून केले आहे.

माऊली ज्ञानदेवांनी सामान्यांना न कळणारे संस्कृतमधील अध्यात्म ज्ञान मराठी-प्राकृत भाषेत आणले. सनातनी कर्मठ लोकांच्या हातातील आध्यात्मिक-धार्मिक सत्तेला खिंडार पाडले. ‘इथे मराठीचिये नगरी’त ब्रह्मविद्येचा सुकाळ केला. सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला. नऊ हजार ओव्यांतून परमार्थाचे व जीवनाचे सार सांगितले. कारण ते भारतातील पहिले बंडखोर क्रांतिकारक संत होते. खऱया अर्थाने ते समाजवादी ग्रंथ असून साधकांना दिव्य जीवनाची पर्वणी साधून देणारा ग्रंथ आहे.  माणुसकी आणि मानवता यांचा सुंदर समन्वय ‘ज्ञानेश्वरी’त झाला आहे.

[email protected]

(लेखक मानसशास्त्र व लोककलेचे अभ्यासक आहेत.)