
नागपूरमधील राणी दुर्गावती चौकात ऑगस्ट महिन्यात एका वृद्ध दाम्पत्याच्या दुचाकीचा अपघात झाला होता. या अपघातात दुचाकी चालवणारे 80 वर्षीय जगदीश देवूळकर यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी शेवंताबाई देवूळकर यांना कोणतीही दुखापत झाली नाही. याप्रकरणाच्या चार महिन्यानंतर पोलिसांनी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या जगदीश यांच्यावरच गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मृत व्यक्तीवर त्याच्याच मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल केल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं आहे.
देवूळकर दाम्पत्य हे 3 ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या सुमारास एका वाढदिवसाच्या पार्टीवरून घरी परतत होते. कांजी हाऊस चौकातून राणी दुर्गावती चौकात जाण्यासाठी त्याने रस्त्याच्या उलट्या दिशेने (राँग वे) दुचाकी नेली. तिथून युटर्न घेत असताना त्यांचा तोल गेला व ते बाईकवरून पडले. या अपघातात जगदीश यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सुदैवाने शेवंताबाई यांना इजा झाली नाही.
गंभीर जखमी झालेल्या जगदीश यांना तत्काळ एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले व तेथून त्यांना इंदिरा गांधी सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र 7 ऑगस्ट रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यशोधरा नगर पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते.
सुरुवातीला पोलिसांनी देवूळकर यांच्या मृत्यूची अपघाती मृत्यू अशी नोंद केली होती. या प्रकरणाचा तपास अहवाल पोलिसांनी जरिपटका विभागाचे पोलीस उपायुक्त रोशन पंडीत यांच्यासमोर सादर केला. तेव्हा त्यांनी देवूळकर यांच्यावर बेजबाबदारपणे गाडी चालवल्याला गुन्हा दाखव केला. त्यांच्या बेजबाबदार ड्रायव्हिंगमुळे त्यांचा मृत्यू झाला असून आता हा अहवाल पोलीस न्यायालयात पाठविणार आहेत.

































































