छावण्यांसाठी 85 कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाकडे मंजूर; पंधरा दिवसांचे अनुदान बाकी

सामना प्रतिनिधी, नगर

चारा छावणीचालकांना मे महिन्यातील अनुदानापोटी वाटप करण्यासाठी राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला 85 कोटी 86 लाख 67 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी छावणीचालकांच्या खात्यावर बिलांची तपासणी केल्यानंतर वर्ग केला जाणार आहे. मे महिन्यातील अनुदानापोटी जिल्हा प्रशासनाला निधी मिळाला असला, तरी अद्याप 16 एप्रिल ते 30 एप्रिल या पंधरा दिवसांच्या अनुदानापोटी राज्य सरकारकडून निधी मंजूर होणे बाकी असून, त्यासाठी पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे.

दुष्काळामुळे तीव्र चाराटंचाई निर्माण झाल्याने राज्य सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला चारा छावण्या सुरू करण्यास मंजुरी दिली. त्यानुसार जिल्ह्यात चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. या चारा छावण्यांच्या अनुदानापोटी 15 एप्रिलपर्यंतचा निधी यापूर्वीच जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला होता. या निधीचे ७५ टक्के वाटपसुद्धा पूर्ण करण्यात आले. दरम्यानच्या काळात चाऱ्यासाठीचा वाढता खर्च लक्षात घेऊन सरकारने अनुदानात वाढ केली. वाढीव दरानुसारच जिल्हा प्रशासनाने चारा छावण्यांचा आढावा घेऊन 16 एप्रिल ते 31 मे या कालावधीतील तब्बल 127 कोटी 99 लाख 52 हजार रुपयांचा निधी सरकारकडे मागितला. प्रत्यक्षात त्यापैकी मे महिन्यातील म्हणजेच 1 मे ते 31 मे या काळातील 85 कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाला मंजूर करण्यात आला.

एप्रिल महिन्यातील अनुदानापोटी मिळणारा निधी मंजूर न झाल्याने या निधीसाठी जिल्हा प्रशासनाने पाठपुरावा सुरू केला आहे. एप्रिल महिन्यातील उर्वरित अनुदान प्राप्त झाल्याशिवाय मे महिन्यातील प्राप्त झालेल्या अनुदानाचे वाटप करण्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळेच प्रशासनाने लवकरात लवकर एप्रिल महिन्यातील उर्वरित अनुदान मिळावे, यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.

छावण्यांची संख्या पाचशेच्या आत

जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या चारा छावण्यांची संख्या आता पाचशेच्या आत आली आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी 511 चारा छावण्यांना मंजुरी दिली होती. त्यापैकी 505 चारा छावण्या प्रत्यक्ष सुरू झाल्या होत्या. मात्र, जूनच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यातील काही भागांत पावसाने हजेरी लावल्याने शेतीच्या कामासाठी शेतकरी आपली जनावरे छावणीतून घेऊन जाऊ लागले आहेत. त्यामुळे आता चारा छावण्यांची संख्याही कमी होऊ लागली आहे. जिल्हा टंचाई शाखेतून प्राप्त आकडेवारीनुसार शनिवारी (15 जून) जिल्ह्यात 498 चारा छावण्या सुरू असून, त्यामध्ये 43 हजार 755 लहान व दोन लाख 86 हजार 249 मोठी अशी एकूण 3 लाख 30 हजार 4 जनावरे दाखल आहेत.

पहिल्या टप्प्यात 75 टक्के अनुदानाचे वाटप

चारा छावण्यांच्या अनुदानापोटी पहिल्या टप्प्यात जिल्हा प्रशासनाला राज्य सरकारकडून 46 कोटी 81 लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले होते. त्यापैकी पहिला हप्ता 23 कोटी 80 लाख रुपये छावणीचालकांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला होता, तर उर्वरित रकमेपैकी 11 कोटी 90 लाख रुपये नुकतेच छावणीचालकांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेल्या एकूण अनुदानापैकी 35 कोटी 70 लाख रुपये अनुदानाचे वाटप झाले असून, उर्वरित अनुदानाची रक्कम मात्र बिलांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर छावणीचालकांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे.