महाडमध्ये ड्रग्जच्या फॅक्टरीवर छापा, 88 कोटी 92 लाख केटामाइन पदार्थ जप्त

महाड औद्योगिक वसाहतीत अमली पदार्थ बनवणाऱ्या एका कारखान्यावर छापा टाकण्यात आला आहे. महाड एम.आय.डी. सी पोलीस, रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि अमली पदार्थविरोधी पथकाने ही धाड टाकत 88 कोटी 92 लाखांचे केटामाइन जप्त केले आहे. याप्रकरणी चार जणांना अटक केली आहे. या कारवाईने अमली पदार्थांचे रॅकेट चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

महाड औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट नं. इ 26/3 येथे रोहन केमिकल्स नावाची कंपनी कार्यरत होती. सध्या या कंपनीत मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ बनवले जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर सदर ठिकाणी पोलिसांनी छापा टाकत ही कारवाई केली. कारवाईदरम्यान केटामाइन नावाचा नशेचा आणि वैद्यकीयदृष्ट्या नियंत्रित अमली पदार्थ मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यात आल्याचे आढळून आले. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्यामध्ये मच्छिंद्र भोसले, सुशांत पाटील, शुभम सुतार, रोहन गवस या आरोपींचा समावेश आहे. सर्व आरोपी महाड व एकजण कोल्हापूर येथील रहिवासी आहे.

रायगडातील सर्वात मोठी कारवाई
महाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे अधिकारी अधिक तपास करत असून या प्रकरणात अजून कोणी सहभागी आहे का याचा तपास केला जात आहे. तसेच या पदार्थांची विक्री कोणत्या मार्गाने आणि कोठे केली जात होती याचीदेखील चौकशी केली जाणार आहे. रायगड जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. या कामगिरीबाबत कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी कारवाई पथकाचे अभिनंदन केले आहे.