कोपरगाव कारागृहातील नऊ कैद्यांना कोरोनाची लागण; उपचारासाठी नगरला नेणार

फोटो प्रातिनिधीक

कोपरगावात तहसील कार्यालयालगत असलेल्या दुय्यम कारागृहातील नऊ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याने कारागृह प्रशासन आणि पोलिसांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सध्या कोपरगावच्या दुय्यम कारागृहात एकूण साठ कैदी आहेत या सर्वांना बराक क्रमांक पाचमध्ये ठेवण्यात आले आहे. कैदी बराकीत असूनही त्यांना कोरोनाची लागण कशी झाली असा सवाल उपस्थित होत आहे.

काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर रस्ता लुटीतील चार कैद्यांना कोपरगाव येथे वर्ग करण्यात आले होते. त्या कैद्यांना ताप, खोकला, सर्दी अशी लक्षणे असल्याने त्यांच्यासह सर्व साठ कैद्यांची व महसूल प्रशासनाच्या आठ कर्मचाऱ्यांची तातडीने रॅपिड कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यात श्रीरामपूरचे वर्ग केलेले चार कैदी व व शहर पोलीस ठाणे कोपरगाव यांनी मालेगाव येथून आणलेला एक कैदी असे पाच कैदी वगळता सर्वांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्याचे प्रभारी तुरुंगाधिकारी यांनी सांगितले. पॉझिटिव्ह आलेल्या पाच कैद्यांना स्वतंत्र बराकीत ठेवण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. दरम्यान कोपरगाव पोलीस ठाण्याच्या सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात येणार आहे. बराकीत असलेल्या कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याने तुरुंग प्रशासन व पोलीस वर्तुळात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात आणखी चार कैद्यांची भर पडल्याने आता एकूण नऊ कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांना नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात येणार आहे.

शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, तहसीलदार योगेश चंद्रे ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर, तालुका आरोग्य अधिकारी संतोष विधाते, शिर्डी, लोणी, राहाता, कोपरगाव शहर व ग्रामीणच्या 5 पोलीस निरीक्षकांनी दुय्यम कारागृहास भेट दिली. गार्ड अंमलदार सुभाष आव्हाड, ए. एस. गुंजाळ, पी.सी. कुंडारे यांचीही कोरोना तपासणी करण्यात आली. येथे असलेल्या 60 कैद्यांपैकी 18 जणांना नाशिक येथील तुरुंगात हलवण्यात येणार आहे. तसा आदेश कारागृह उपमहानिरीक्षक संभाजीनगर यांनी दिला आहे. या प्रकरणाचा सर्व अहवाल कारागृह निरीक्षक पुणे, जिल्हाधिकारी नगर, कोपरगावचे न्यायाधीश व तहसीलदार आदींना पाठवण्यात आला आहे.

कोपरगाव तालुक्यातील दुय्यम कारागृह नेहमीच चर्चेत असते. येथे राहाता लोणी बाभळेश्वर शिर्डी व कोपरगाव तालुक्यातील कैदी आणले जातात. येथील चार बराकीची संख्या केवळ वीस असताना 60 ते 80 कैदी कोंबले जातात. याबाबत सातत्याने आवाज उठवूनही कारागृह प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे आता बराकीची स्वच्छता ठेवली असल्याचे प्रभारी तुरुंगाधिकारी यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या