नऊ वर्षांच्या मुलीने पोलिसांना पत्र, सेवेसाठी मानले आभार

431

कर्जत मधील एका शाळेच्या मुख्याध्यापिकांच्या नऊ वर्षाच्या नातीने कोरोना विरोधात रस्त्यावर लढणाऱ्या पोलिसांना पत्र लिहून सलाम केला आहे. आपण घरात राहून त्यांना सहकार्य करूया अशी भावना तिने पत्रातून व्यक्त केली आहे.

कर्जत महिला मंडळ संचलित विद्या विकास मंदिर या शाळेच्या मुख्याध्यापिका आणि कर्जत पोलीस ठाण्याच्या दक्षता समिती सदस्या मीना प्रभावळकर यांची इंग्रजी माध्यमात इयत्ता 4 थी मध्ये शिक्षण घेणारी 9 वर्षाची नात कु. दुर्वा सचिन शेठ हिने काल दि.28 मार्च रोजी कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण भोर यांना पत्र लिहून पोलीस खात्याला सलाम केला आहे. या पत्रात तिने ‘मी सुटी लागली म्हणून कर्जतला आजीकडे आले आणि अचानक सर्व ठिकाणी बंद सुरू झाला याबाबत आजीकडून मला सारा प्रकार समजला त्यामुळे भीती वाटू लागली. टीव्हीवरून पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचे बोलणे ऐकल्यावर घरा बाहेर पडायचे नाही हे कळले. आम्ही सारेजण घरात आहोत आणि तुम्ही सर्व पोलीस घराबाहेर राहून सर्वांना लांब राहायला सांगून आम्हाला सुरक्षित ठेवता. हे मी रोज टीव्ही मध्ये पहाते त्यामुळे तुमच्या बद्दल मला नितांत आदर आहे. घरी असल्याने माझा दररोज एक वेगळा उपक्रम असतो. आज लेटर रायटिंग असल्याने तुम्हाला पत्र लिहून तुमचे आभार मानावे असे वाटले. कारण तुम्ही तुमच्या कुटुंबाला घरी ठेऊन दररोज आमच्या संरक्षणासाठी बाहेर पडता म्हणून तुम्हाला सलाम.’ असे शेवटी लिहिले आहे. हे पत्र मराठी भाषेत लिहिले असून त्यामध्ये तिने सर्रास इंग्रजी शब्द वापरून आपल्या निष्पाप भावना व्यक्त केल्या आहेत.

हे पत्र रायगड पोलिसांनी ट्विट करून ‘दुर्वा सारख्या चिमुरडीने पत्र लिहून आम्हाला सलाम केला आहे. त्यामुळे आमचं जस घरी एक कुटुंब आहे तसेच आमची काळजी घेणार घराबाहेरही संपूर्ण समाजाच एक कुटुंब आहे आणि या सर्वांच पालन करणे हे आमच कर्तव्य आहे. दुर्वा सारखेच आपण घरात राहू या आणि कोरोना विरुद्धचा लढा यशस्वी करू या. असे म्हटले आहे.

रविवारी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण भोर यांनी दुर्वाच्या कर्जत येथील निवासस्थानी जाऊन तिला गुलाब पुष्प आणि श्रीकृष्ण यांच्यावरील पुस्तक भेट देऊन कौतुक केले.यावेळी तिची आजी मिना प्रभावळकर, आई भाग्यश्री शेठ यांच्यासह पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक जोगदंड उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या