
मुंबईत 22 जून ते 17 जुलै या कालावधीत झालेल्या जोरदार पावसामुळे तब्बल 901 झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. शिवाय 1 हजार 251 ठिकाणी झाडाच्या फांद्याही कोसळल्या आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी जोरदार पावसात घराबाहेर पडल्यास धोकादायक झाडांखाली किंवा झाडाजवळ थांबू नये आणि झाडाच्या धोक्याबाबत पालिकेच्या 1916 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
मुंबईत झाड पडून आतापर्यंत तीन जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून धोकादायक झाडे आणि फांद्या हटवण्याचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. यामध्ये सार्वजनिक आणि खासगी क्षेत्र मिळून 3 हजार 841 ठिकाणी झाडे, फांद्या हटविणे, वृक्ष छाटणीची कामे पालिकेच्या उद्यान विभागाकडून पूर्ण करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे पालिका क्षेत्रातील उर्वरित 542 ठिकाणची कार्यवाहीदेखील प्रगतिपथावर आहे. काही ठिकाणी झाडे किंवा फांद्या हटविण्याचे काम संबंधित जागेची परिस्थिती, हवामान, सुरक्षितता आणि आवश्यक परवानग्या यामुळे टप्प्याटप्प्याने सुरू आहे. तर मालक अथवा संबंधितांचा दावा नसलेल्या 2206 ठिकाणी वृक्ष छाटणी संबंधित मालकांनी करणे गरजेचे होते. त्यापैकी 1 हजार 857 ठिकाणांवरील काम पूर्ण करण्यात आले असून उर्वरित 360 ठिकाणी काम सुरू असल्याची पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
आपत्कालीन पथके 24 तास कार्यरत
झाड पडून होणाऱया दुर्घटना टाळण्यासाठी उद्यान विभागाचे नियंत्रण कक्ष, क्षेत्रीय कार्यालये आणि आपत्कालीन पथके 24 तास कार्यरत असून, पावसाळ्याच्या संपूर्ण कालावधीत अशा घटनांवर तातडीने प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, उपकरणे आणि यंत्रसामग्री सज्ज ठेवण्यात आली आहेत.
पालिका क्षेत्रात 367 झाडे कोसळली
22 जूनपासून आतापर्यंत पालिका क्षेत्रात 367 झाडे उन्मळून पडली. त्यापैकी 359 ठिकाणांवरील झाडे हटविण्यात आली आहेत. 8 ठिकाणांवरील काम प्रगतिपथावर आहे. खासगी क्षेत्रात 524 झाडे पडली. त्यापैकी 452 ठिकाणांवरील झाडे हटविण्यात आली असून 72 ठिकाणी कार्यवाही सुरू आहे.
पालिका क्षेत्रात 552 फांद्या कोसळल्या असून त्यापैकी 541 ठिकाणी फांद्या हटविण्यात आल्या आहेत तर 11 ठिकाणी काम सुरू आहे. खासगी क्षेत्रात 723 फांद्या कोसळल्या. त्यापैकी 632 ठिकाणांवरील फांद्या हटविण्यात आल्या आहेत, तर 91 ठिकाणी कार्यवाही सुरू आहे.























































