बडोदा मराठी साहित्य संमेलन गायकवाड विद्यापीठात

सामना प्रतिनिधी । बडोदा

गुजरातमधील बडोदा येथे १६ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. संमेलन बडोद्यात महाराज सयाजीराव गायकवाड विद्यापीठ येथे होणार आहे. विद्यापीठात संमेलन होत असल्याने खर्चात ६० टक्के बचत होणार आहे. या संमेलनाच्या निमित्ताने मराठी आणि गुजराती भाषेचा समन्वय साधला जाणार आहे.

विद्यापीठ बडोद्यात मध्यवर्ती ठिकाणी असल्याने साहित्यप्रेमींना संमेलनस्थळी येणे सोपे जाईल. रेल्वे आणि बसने बडोद्यात संमेलनासाठी येणाऱ्यांनाही संमेलनस्थळी येणे सुलभ होईल, असे प्रसिद्धी प्रमुख संजय बच्छाव यांनी सांगितले. याआधी संमेलनाच्या स्वागताध्यक्षा श्रीमंत राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली विषय समितीची १८ ऑक्टोबर रोजी बैठक झाली होती. या‌त विद्यापीठाच्या सिनेट समितीच्या सदस्यांसह १८ जणांचा सहभाग होता. मराठी साहित्य संमेलन विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित करण्यात यावे, असा प्रस्ताव विद्यापीठाच्याच सिनेट सदस्यांनी मांडला. मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा बडोद्यातील गायकवाड विद्यापीठात शिकण्यासाठी येणाऱ्या बहुभाषिक विद्यार्थ्यांना लाभ होईल, असे मत सिनेट सदस्यांनी मांडले होते. त्यावर सविस्तरपणे सकारात्मक चर्चाही झाली. मात्र, संमेलनस्थळाची घोषणा करण्यापूर्वीच राज्यातील विधानसभा निवडणूक जाहीर झाली. आचारसंहिता लागू झाल्याने आणि विषय ‌समितीसमोर मांडण्यात आलेल्या ठरावाला अंतिम मंजुरी मिळणे बाकी असल्याने संमेलन स्थळाची घोषणा आयोजकांना करता आली नव्हती.

आपली प्रतिक्रिया द्या