
जालना शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर शहरात आदर्श आचारसंहिता लागू असून प्रशासकीय यंत्रणा अत्यंत सतर्कतेने काम करत आहे. या दरम्यान, छत्रपती संभाजीनगर चौफुली टोलनाका येथे तैनात असलेल्या स्थितिक सर्वेक्षण पथकाने (SST) शुक्रवारी दुपारी मोठी कारवाई करत एका वाहनातून तब्बल 98 लाख रुपयांची अघोषित रोख रक्कम जप्त केली.
शुक्रवार, 9 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2.28 वाजण्याच्या सुमारास टोलनाक्यावर तैनात असलेल्या एसएसटी पथकाने एम.एच. 21 बी.एफ. 8733 क्रमांकाची ह्युंदाई क्रेटा कार तपासणीसाठी थांबवली. वाहनाची सखोल झडती घेतली असता त्यामध्ये 98 लाख रुपये रोख आढळून आले. यानंतर एसएसटी पथक आणि चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी रकमेचा रीतसर पंचनामा केला.
आयकर विभागामार्फत पुढील तपास
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 10 लाख रुपयांपेक्षा अधिक रोख रक्कम आढळल्यास त्याची माहिती आयकर विभागाला देणे बंधनकारक आहे. त्यानुसार आदर्श आचारसंहिता कक्षाने छत्रपती संभाजीनगर येथील उप आयकर संचालक (तपास) यांना या प्रकरणाची माहिती दिली आहे. आयकर विभागाकडून पुढील तपास पूर्ण होईपर्यंत ही रोकड चंदनझिरा पोलीस ठाण्यात सुरक्षितरीत्या जमा करण्यात आली आहे.
प्रशासनाचा कडक पहारा
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय आणि निष्पक्ष वातावरणात पार पडावी, यासाठी जिल्हाधिकारी तथा आयुक्त श्रीमती आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व प्रवेशद्वारांवर कडक नाकाबंदी करण्यात आली आहे. निवडणूक काळात मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी किंवा प्रलोभन देण्यासाठी रोख रकमेचा वापर होऊ नये, यासाठी एसएसटी पथके 24 तास कार्यरत असून प्रशासनाकडून सातत्याने काटेकोर नजर ठेवली जात आहे.






























































