हिंदूच्या घरात हाफीज सईद निर्माण होतील, प्रकाश आंबेडकरांचे वादग्रस्त विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, भोपाळ

भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर महाराष्ट्र बंदची हाक देणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. महाराष्ट्र सरकारने जर या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली नाही तर हिंदूच्या घरात हाफीज सईद निर्माण होतील असं त्यांनी विधान केलं आहे. भाजपविरोधात विरोधकांनी ‘ लाठी रॅली’ चं आयोजन करण्यात आलं होतं,या सभेला आंबेडकरांनाही बोलावण्यात आलं होतं. त्यांच्याव्यतिरिक्त माजी खासदार शरद यादवही या सभेत सहभागी झाले होते. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने सुखलाल कुशवाहा यांच्या ५४ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने या सभेचं आयोजन केलं होतं.

आंबेडकरांनी या सभेत बोलताना आरोप केला की महाराष्ट्र सरकार दोषींवर कारवाई करण्याऐवजी पिडीत व्यक्तींनाच त्रास देत आहे. हे सगळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावरून सुरू असल्याचाही आरोप त्यांनी केला. जर सरकारने दोषींवर कारवाई केली नाही तर हिंदूंच्या घरातही हाफीज सईद जन्माला येतील असं विधान त्यांनी या सभेत केलं. समाजवादी नेते शरद यादव यांनी यावेळी बोलताना मागासवर्गीयांना एकत्र येऊन कट्टरवाद्यांचा मुकाबला करणं गरजेचं आहे. जर सरकारनेच या प्रकरणातील दोषींना मदत करायला सुरुवात केली तर मग त्यांच्यावर अंकुश ठेवणार तरी कोण ? देशातील अवस्था बिकट झाली असून ती दिवसेंदिवस आणखी बिकट होत जाईल अशी भीतीही यादव यांनी व्यक्त केली आहे.