
सामना प्रतिनिधी, नगर
भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रासाठी २६ एप्रिल २०१८पासून सिंचन व बिगरसिंचनासाठी सोडलेले पाण्याचे आवर्तन मंगळवारी २९ मे रोजी दुपारी १२ वाजता बंद करण्यात आले. या आवर्तनात सिंचनासाठी ३६७६ दशलक्ष घनफूट व बिगरसिंचनासाठी ८०० दशलक्ष घनफूट असा एकूण ४४७६ दलघफू पाण्याचा वापर झाला आहे. हे आवर्तन ३३ दिवस सुरू होते.
निळवंडे धरणाच्या द्वार दुरूस्तीचे काम ऊर्ध्व प्रवरा विभाग संगमनेर यांचे मार्फत सुरू करण्यात येत आहे. हे काम साधारणपणे २० दिवस सुरू राहिल. द्वार दुरूस्तीचे काम संपताच उन्हाळ्याच्या हंगामाचे तिसरे आवर्तन साधारण २० जूनपासून सोडण्यात येईल. आवर्तन संपल्यावर भंडारदरा धरणात ३२०६ व निळवंडे धरणात ५६० दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे, अशी माहिती नगरच्या पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली आहे.































































