पुणे शहर परिसरात पावसाची हजेरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

पुणे शहर व परिसरात शुक्रवारी सायंकाळनंतर पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आकाशात काळेकुट्ट ढग दाटून आले. दुपारी चार वाजता उपनगरांच्या काही भागांत वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली.

शिवाजीनगर परिसरात मुसळधार पाऊस पडला असून, खडकवासला परिसर, सातारा रस्ता परिसर, बिबवेवाडी, कोंढवा, स्वारगेट, टिळक रस्ता, फर्ग्युसन कॉलेज रस्ता, विद्यापीठ परिसर, सिंहगड रस्ता आदी उपनगरांच्या भागांत रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत शहरात (शिवाजीनगर) २५.३ मि.मी. पावसाची नोंद झाली. दरम्यान, उद्योगनगरी पिंपरीत दुपारनंतर वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडला. काही ठिकाणी गारा पडल्या. पुढील दोन-तीन दिवस शहराच्या काही भागांत दुपारनंतर मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

सायंकाळी सुटलेल्या वाऱ्यांमुळे विविध भागांमध्ये झाडे पडण्याच्या, तर काही ठिकाणी फांद्या पडण्याच्या घटना घडल्या. शिवाजीनगर आणि फर्ग्युसन रस्त्याच्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते; तर कोथरूडमधील राहुलनगर, मयूर कॉलनीतील काही सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. कोथरूडमधील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामागील वकीलनगर, सिंहगड रस्त्यावरील सावली ढाबा, एरंडवणे परिसरातील अभिषेक हॉटेलजवळ, रविवार पेठेतील काचीआळी या ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्या. तर, मॉडेल कॉलनीतील भारती विद्याभवनजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या चारचाकी गाडीवर झाड पडून गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. औंधमधील वेस्टएंड मॉलजवळील एमईसीबीमध्ये झाड पडले; तर बुरुडआळीमध्ये झाडाच्या फांद्या पडल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.