
सामना प्रतिनिधी । पुणे
पानशेत धरणाच्या सांडव्यातून आंबी नदीत सोडलेल्या पाण्यात पडलेली चप्पल काढण्यासाठी पाण्यात उतरलेल्या डॉक्टर तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. शुक्रवारी दुपारी या डॉक्टर तरुणाचा मृतदेह स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढला.
डॉ. काशिनाथ अनंतराव खाटपे (वय २९, मूळ रा. वाठार, ता. भोर, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. गुरुवारी दुपारी काशिनाथ आणि त्याचे मित्र पानशेत धरणाच्या परिसरात फिरण्यासाठी आले होते. फिरत फिरत ते दुपारी चार वाजता सांडव्याच्या उजव्या तिरावरून पायी चालत जात होते. यावेळी काशिनाथच्या पायातील चप्पल सांडव्यात पडली. त्यामुळे चप्पल काढण्यासाठी त्याने पाण्यात उडी मारली. पाण्याच्या प्रवाहाचा वेग जास्त असल्याने काशिनाथ त्यात बुडाला.































































