आरटीओ कार्यालयात आग; अनेक कागदपत्रे जळाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) पहिल्या मजल्यावर बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या घटनेत कार्यालयातील काही महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत पंधरा ते वीस मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, आगीच्या घटनेमुळे कार्यालयातील वीजपुरवठा खंडित झाल्याने दिवसभरासाठी कार्यालयीन कामकाज बंद ठेवण्यात आले होते.

संगम पुलाजवळ आरटीओ कार्यालयाची दुमजली इमारत आहे. यात पहिल्या मजल्यावर महत्त्वाची कागदपत्रे ठेवलेली आहेत. या इमारतीमधून सकाळी आठच्या सुमारास अचानक धूर बाहेर येऊ लागला. आग लागल्याचे लक्षात येताच, अग्निशमन विभागाला कळविण्यात आले. अग्निशमन केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन विभागाच्या तीन गाड्या आणि दहा जवान घटनास्थळी दाखल झाले. आरटीओचे मुख्य गेट बंद असल्याने जवानांनी खिडक्या उघडून त्यातून आग विझवण्याचा प्रयत्न केला. आग लागलेल्या हॉलमध्ये आरटीओसंबंधित कागदपत्रांची संख्या मोठी होती. त्यातील काही कागदपत्रे आगीमध्ये जळून खाक झाली आहेत, तर अग्निशमन जवानांच्या तत्परतेमुळे बहुतांश कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यात यश आले आहे. दरम्यान, आग लागलेल्या ठिकाणी कागदाचे मोठमोठे गठ्ठे असून, आग नेमकी कशामुळे लागली, हे समजू शकले नसल्याचे स्टेशन ड्युटी ऑफिसर विजय भिलारे यांनी सांगितले.

दरम्यान, आगीची घटना घडल्याने आरटीओतील वीजपुरवठा खंडित झाला होता. काही वेळात वीजपुरवठा सुरू होईल, असे वाटले होते; परंतु उशिरापर्यंत तो सुरू न झाल्याने आरटीओतील कामकाज दिवसभरासाठी बंद ठेवण्यात आले होते.

कार्यालयाला नक्की कशामुळे आग लागली, हे अद्यापि समजले नाही. मात्र, अशा घटना घडू नयेत, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले आहे. तसेच, आगीमध्ये काही कागदपत्रे जळाली आहेत. परंतु, कार्यालयातील सिस्टिमचा सर्व डाटा असल्याने मोठं नुकसान झालं नाही. तसेच, आज सुरक्षिततेच्या कारणास्तव कार्यालयीन कामकाज बंद ठेवले होते. गुरुवारी हे कामकाज पूर्ववत सुरू राहील, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी सांगितले.