सामना ऑनलाईन । जयपूर
‘नीट’च्या परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या १८ वर्षांच्या मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे . करण असं त्याच नाव आहे. करण हा राजस्थानमधील कोचिंग हबच्या कोट्यामधून दिल्या जाणाऱ्या खोलीत भाड्याने राहत होता.
करणने आत्महत्या केली त्यादिवशी त्याचं त्याच्या वडिलांसोबत फोनवर बोलणं झालं होतं. त्यादिवशीच डॉक्टरकीचा अभ्यास करत असलेल्या करणने अचानक पंख्याला लटकून गळफास लावून घेतला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. करणच्या घराजवळ राहणाऱ्या व पेशानं पोलीस असलेल्या देवकीनंद यांनी करणच्या खोलीचा दरवाजा तोडून त्याला खाली उतरवलं. ताबडतोब करणला रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आलं. परंतु, डॉक्टरांनी तिथे त्याला मृत घोषित केलं.
या प्रकरणाचा तपास करणारे साहाय्यक पोलीस अधिकारी अत्तर सिंह यांनी करणच्या वडिलांना याबद्दल कळवलं. पोलिसांना करणच्या आत्महत्येमागील कारणाचा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे करणच्या आयुष्यात नेमकं काय घडलं, ज्यामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचललं, हे स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.


























































