मानखुर्द येथे कॅश व्हॅन लुटणाऱ्या टोळीतील पाच जणांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

१३ जून रोजी मानखुर्द येथे सिक्युरिटी ट्रान्स कंपनीची कॅश व्हॅन लुटून १६ लाखांच्या रोकडसह पळून गेलेल्या टोळीतील पाचजणांना मानखुर्द पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी एक लाख दोन हजार किमतीचा ऐवज हस्तगत केला आहे. दरम्यान या गुह्यातील आणखी आठ आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

सिक्युरिटी ट्रान्स कंपनीकडे रेल्वेच्या हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानकातील रोकड जमा करून ती गोरेगाव येथील कार्यालयात जमा करण्याचे कंत्राट होते. त्यानुसार गेल्या बुधवारी २९ ठिकाणांहून पैसे जमा करून कंपनीची कॅश व्हॅन मानखुर्द रेल्वे स्थानकातील पैसे घेण्यासाठी तेथे गेली होती. पैसे घेऊन गोरेगावच्या दिशेने जाण्यासाठी व्हॅन निघाली असता मानखुर्दच्या सर्व्हिस रोडवर अल्टो कारमधून आलेल्या तसेच तेथे अगोदरच दबा धरून बसलेल्या आरोपींनी व्हॅनवर हल्ला चढवून १६ लाखांची कॅश लुटून नेली होती. या घटनेनंतर मानखुर्द पोलिसांनी तपास सुरू केल्यावर गुह्यातील कार गोवंडी येथील आगारवाडी परिसरात बेवारस मिळाली. अधिक तपासात ती कार नवी मुंबईच्या नेरूळ येथून चोरीला गेल्याचे समोर आले. तसेच गुह्याच्या वेळेस आरोपींनी एक ऑटोरिक्षादेखील वापरल्याचे कळताच खबऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी ऑटोरिक्षाचालक मोहम्मद सगीर ऊर्फ गुलाब याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी विजय लोहट, डेव्हिड लॉरेन्स, जगदीश ऊर्फ जग्गू आणि संतोष राजपूत अशा अन्य चौघांना अटक केली. यापूर्वीही चार वेळा प्रयत्न करून सिक्युरिटी ट्रान्स कंपनीची कॅश व्हॅन कुठून कुठे जाते याची इत्थंभूत माहिती आरोपींकडे होती. त्यानुसार आरोपींनी रेकी करून यापूर्वीदेखील चार वेळा व्हॅन लुटण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तेव्हा त्यांना यश आले नव्हते. यावेळी मात्र व्यवस्थित प्लॅन रचून गुन्हा केला होता असे तपासात निष्पन्न झाल्याचे उपायुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले.

दरोडेखोर अट्टल गुन्हेगार

कॅश व्हॅन लुटण्यासाठी प्रत्येकावर जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानुसार डेव्हिडने चोरीची अल्टो कार उपलब्ध करून दिली होती. जगदीश आणि संतोष यांनी गुन्हा करण्यासाठी बनावट सीमकार्ड उपलब्ध करून दिले होते. सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार असून प्रत्येकाविरोधात अनेक पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी काही महिन्यांपूर्वी वलसाड येथील टोलनाक्यावर देखील दरोडा टाकला होता.