पावसाळ्यात पाणी कसे प्याल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
शरीरातील पाणी कमी झाल्यास त्वचा कोरडी होऊन सुरकुत्या पडतात.

सामना ऑनलाईन, मुंबई

पावसाने आता चांगलाच जोर धरलेला आहे. पाऊस म्हटलं म्हणजे सगळीकडे चिखल… साचलेले पाणी… हे ओघाने आलंच. जगून राहायचं तर पाणी प्यावंच लागतं. पण पावसाळ्यात मात्र हेच पाणी नेमकं कसं प्यावं हा प्रश्न पडतोच. केवळ पावसाळ्यातच नाही, तर एरवीही पाणी शक्यतो उकळून थंड केलेलंच प्यावं. आरोग्यासाठी ते हिताचंच असतं. बाहेर मिळणारे पाणीपुरी, फळांचे ज्यूस हेसुद्धा पावसाळ्यात टाळायलाच हवेत. कारण त्यात दूषित पाणी मिसळले असण्याची शक्यता जास्त असते.

गरम पाणी पिण्याचे आरोग्याच्या दृष्टीने बरेच फायदेही आहेत. पावसाळ्याच्या या दिवसांत हे फायदे लक्षात घेतले पाहिजेत. कारण गरम पाणी आपल्याला बऱ्याच आजारांपासून दूर ठेवायला मदत करू शकते. एकदम गरम पाणी प्यायचे नाही. ते कोमट झाल्यावर प्यायले तरच फायद्याचे ठरेल. कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील विषाक्त घटक बाहेर पडतात. सकाळच्या वेळी उठल्यावर रिकाम्या पोटी आणि रात्री जेवल्यानंतर एका तासाने कोमट पाणी पिणे स्वास्थ्यकारक असते. यामुळे कफ आणि पोटाचे विकार नाहीसे होतात.

त्वचेचेही काही विकार असतील तर ते पावसाळ्यात कोमट पाणी प्यायल्याने दूर होऊ शकतात. या पाण्याच्या नियमित पिण्याने चेहराही टवटवीत दिसू लागतो. गरम पाणी पिण्याचा सर्वात चांगला फायदा म्हणजे त्यामुळे लठ्ठपणा कमी होतो. कारण हे गरम पाणी शरीरातील वाढलेली अतिरिक्त चरबी कमी करते. या पाण्याच्या नियमित पिण्याने पचनक्रिया सुधारून अन्न चांगले पचते. त्यामुळे असे अन्न शरीराला पोषकच ठरते. वातविकारही गरम पाणी प्यायल्याने कमी होऊ शकतात. हाही त्याचा एक फायदाच म्हणता येईल.

सकाळी गरम पाणी प्या

सकाळच्या वेळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे भरपूर फायदे आहेत. त्यामुळे सॉफ्ट ड्रिंकऐवजी कोमट पाणी लिंबाचा रस घालून प्यायले तर शरीराची एनर्जी लेव्हल चांगलीच वाढते आणि पचनक्रियाही सुधारते. दुसरे म्हणजे शरीराला आवश्यक असलेला रक्तप्रवाह नियमित कोमट पाणी प्यायल्यानेच सुरळीत राहातो. अॅसिडीटीपासून आराम हवा असेल तर कोमट पाण्याशिवाय पर्याय नाही.जेवल्यानंतर फक्त एक कपभर गरम पाणी पिण्याची सवय ठेवा. त्यामुळे जेवण लवकर पचेल आणि पोट हलके होईल. गरम पाण्यामुळे चेहNयावरील सुरकुत्याही बNयाच अंशी कमी होऊ शकतात. खोकला आणि छातीत दुखणं हे विकार तर कुणालाही आणि कधीही होऊ शकतात. पण कोमट पाणी नियमित प्यायल्याने गळा स्वच्छ होऊन आराम मिळतो.

पावसाळ्यात ही काळजी घ्या…

  • स्वयंपाक करण्याची जागा स्वच्छ व निर्जंतुक साबणाने स्वच्छ करून घ्यावी.
  • घरात ओला व सुका कचरा वेगळा ठेवा.
  • भांडी, कपडे ओलसर ठेवू नका. आपले घर, परिसर स्वच्छ ठेवा.
  • मुलांची खेळणी आठवड्यातून एकदा निर्जंतुक पाण्यातून विसळून घ्यावीत.
  • घराच्या भोवती कुंड्या लावल्या असतील तर पावसापूर्वी त्याची छाटणी करावी, घरामध्ये झाडे लावू नयेत. यात पाणी साठून डासांची पैदास वाढते.
  • पिंपासारख्या मोठ्या भांड्यामध्ये साठवणूक केलेले पाणी एका दिवसाच्या वर साठवून ठेऊ नये. त्यात डास वाढतात.

कोमट पाणी हवेच

  • सर्दी झाली की ताप येतो. अंगदुखी असतेच. अशावेळी फक्त कोमट पाणी उपयोगी पडते. अशावेळी पारिजातकाची थोडी पाने घालून उकळलेले पाणी दिले तर कणकण दूर होईल.
  • घसा दुखत असेल, तर कोमट पाणी प्यावे. सर्दी-खोकला या विकारातही तुळस, गवती चहा, काळीमिरी आणि ज्येष्ठमध घालून पाणी उकळावे व हे पाणी गरम स्वरूपात प्यावे. फायदा होईल.
  • सर्दी-खोकला-ताप या विकारात डोकेदुखी असतेच. अशावेळी नागरमोथा, सुंठ, वाळा, चंदन, पित्तपापडा समभाग एकत्र करून अर्धा चमचा पावडर पाण्यात उकळावी आणि हे पाणी प्यायला द्यावे. तापात लागणारी तहान भागेलच, पण अंगाची जळजळही कमी होईल.
  • चमचमीत बटाटावडा, भजी खायची इच्छा होतेच, पण त्यानंतर त्रास झाला तर पोटदुखी, पित्ताचा त्रास सुरू होतो. अशावेळी फक्त कोमट पाणी हाच उपाय ठरू शकतो.
  • साध्या पाण्यात १ चमचा बडीशेप घालून पाणी उकळावे. हे पाणी गरम स्वरूपात दिल्यास पोटदुखी कमी होते. जुलाब, मुरडा येणे या तक्रारी जोडीला असतील तर पाव चमचा बडीशेप आणि सुंठ एकत्र करून पाणी उकळावे व मिश्रण प्यावे. सुंठीमुळे अपचन दूर होते.