
सामना प्रतिनिधी, मुंबई
पाऊस पडायला सुरुवात झाली की शेतकरी पेरणीच्या कामाला लागतात त्याचप्रमाणे महापालिकेच्या उद्यान विभागाने दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या महिनाभरात तब्बल ३५ हजार झाडे लावण्यात येणार आहेत. त्यापैकी मुंबईकरांना झाडे लावण्यासाठी २५ हजार रोपटी मोफत दिली जाणार आहेत. यावेळी विदेशी झाडांऐवजी देशी झाडे लावण्यावर उद्यान विभाग भर देण्यात येणार आहे.
दरवर्षी पावसाळ्यापासून ते साधारणतः दिवाळीपर्यंत उद्यान खात्याद्वारे मुंबईत झाडे लावण्याचा कार्यक्रम हाती घेतला जातो. जुलै महिन्यात राज्य सरकारच्या कार्यक्रमांतर्गत महापालिकेच्या अखत्यारितील परिसरांमध्ये दहा हजार रोपटी लावण्यात येणार आहेत. खासगी व महापालिका परिसरात झाडे लावताना मुंबईच्या स्थानिक पर्यावरणाला अनुकूल ठरतील अशाच प्रकारची झाडे प्राधान्याने लावण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याचे राज्य पुष्प असणाऱ्या तामण, समुद्रफुल, शेवर, काशिद, कारंज, जंगली बदाम, आवळा, नागकेशर, कमंडलू, बकुळ, अर्जुन, पुत्रंजीव, रोहितक, बहावा (अमलताश), पेल्टोफोरम, कडुलिंब, सीता अशोक, सुरू, पिंपळ यासारख्या झाडांच्या रोपटय़ांचा समावेश आहे, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.
२५ हजार रोपटी मोफत देणार
मोठय़ा संख्येने वृक्षारोपण व्हावे यासाठी पालिकेच्या उद्यान विभागाने १ ते ३१ जुलै २०१८ या एक महिन्याच्या कालावधीत जुलै महिन्यात २५ हजार देशी झाडांची रोपटी विनामूल्य देण्याचा निर्णय घेतला आहे. सोसायट्यांच्या आवारात, शाळा, महाविद्यालये, व्यावसायिक आस्थापना अशा खासगी परिसरात झाडे लावण्यास इच्छुक असलेल्यांना ही रोपटी घेता येणार आहेत. वेगवेगळय़ा देशी प्रजातींच्या झाडांची २५ हजार झाडे विनामूल्य दिली जाणार असून ती झाडे जगविण्याची हमी संबंधित अर्जदारांना घ्यावी लागणारआहे.



























































