फिफा वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीचा थरार मंगळवारपासून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

सामना ऑनलाईन, सेंट पीटर्सबर्ग

रशियामध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत सर्व लढती जिंकणारा एकमेव संघ म्हणजे बेल्जियम, मात्र सुस्साट सुटलेल्या बेल्जियमच्या मार्गात उद्या पहिल्या उपांत्य लढतीत बलाढ्य फ्रान्सचा अडथळा असेल. बेल्जियमने ३२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर फुटबॉल वर्ल्डकपची उपांत्य फेरी गाठलेली आहे. दुसरीकडे १९९८ मध्ये जगज्जेता ठरलेला फ्रान्स पुन्हा एकदा जेतेपदाच्या झळाळत्या करंडकावर नाव कोरण्यासाठी सर्वस्व पणाला लावताना दिसतोय. बेल्जियमचा स्पर्धेतील थक्क करणारा प्रवास आणि फ्रान्सने नॉकआऊट चरणात केलेला भन्नाट खेळ बघता मंगळवारी उभय संघांतील जो संघ अंतिम फेरी गाठेल त्याच संघाला जगज्जेतेपदाची अधिक संधी असेल.

लुकाकू, हेजार्डवर मदार

फ्रान्सविरुद्ध आरपारच्या लढतीत बेल्जियमची मदार खर्‍या अर्थाने स्टार खेळाडू रोमेलू लुकाकू व कर्णधार एडन हेजार्ड यांच्यावर असेल. बेल्जियमने गटफेरीत पनामाचा ३-० ने तर ट्युनिशियाचा ५-२ गोलफरकाने धुव्वा उडवून स्पर्धेची धडाकेबाज सुरुवात केली होती. त्यानंतर जेतेपदाच्या शर्यतीतील इंग्लंडवरही बेल्जियमने १-० असा सनसनाटी विजय मिळविला. त्यानंतर नॉकआऊट चरणात जपानविरुद्ध ०-२ ने पिछाडीवर पडल्यानंतरही बेल्जियमने जबरदस्त पुनरागमन करून ३-२ फरकाने सामना जिंकला. मग पाच वेळचा जगज्जेता ब्राझीलला २-१ गोलफरकाने नमवून या संघाने उपांत्य फेरी गाठली आहे. लुकाकू, हेजार्ड आणि केविन डे ब्रूने यांच्या योजनाबद्ध खेळामुळे बेल्जियमच्या आघाडीच्या फळीची धार वाढली आहे. त्यांच्या संरक्षण फळीनेही आपली कामगिरी चोखपणे बजावली असून गोलरक्षक तिबाऊट कोर्टुआने मोक्याच्या वेळी गोलपोस्टपुढे अभेद्य कामगिरी केली आहे. त्यामुळे फ्रान्सला नमविण्याची या संघात नक्कीच क्षमता आहे.

 

सांघिक खेळ हेच मुख्य अस्त्र

फ्रान्सने चार विजय आणि एका ड्रॉसह वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. २००६ मध्येही या संघाने फायनलमध्ये धडक दिली होती, मात्र पेनल्टी शूटआऊटमध्ये इटलीने बाजी मारल्याने फ्रान्सला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. यंदाच्या स्पर्धेत फ्रान्सची सुरुवात तशी हळुवारच झाली होती. गट फेरीत ऑस्ट्रेलियाला २-१ ने, तर पेरूला १-० फरकाने हरवून या संघाचे आपला प्रवास सुरू केला होता. डेन्मार्कविरुद्ध त्यांना बरोबरीवर समाधान मानावे लागले होते, मात्र बाद फेरीमध्ये फ्रान्सने खर्‍या अर्थाने कात टाकली. थरारक उपउपांत्यपूर्व लढतीत अर्जेंटिनावर ४-३, तर उपांत्यपूर्व फेरीत उरुग्वेवर २-० असा विजय मिळवून फ्रान्सने उपांत्य फेरीत धडक दिलेली आहे. १९ वर्षीय किलियन एम्बापे आणि एंटोनी ग्रीजमन यांनी स्पर्धेत आतापर्यंत ३-३ गोल केले आहेत. याचबरोबर पॉल पोग्बा व एंगोलो कांते हे मधल्या फळीतील अनुभवी खेळाडू कुठल्याही क्षणी प्रतिस्पर्धी संघासाठी डोकेदुखी ठरू शकतात. बचाव फळीची जबाबदारी सॅमुअल उमताती व राफेल वरान यांच्या खांद्यावर असेल. एकूणच काय तर सांघिक खेळ हेच फ्रान्सचे मुख्य अस्त्र होय. प्रशिक्षक दिदिएर देसचाम्पस यांच्या नेतृत्वाखाली फ्रान्सने १९९८ मध्ये वर्ल्डकप जिंकला होता. यावेळी प्रशिक्षक या नात्याने आपल्या संघाला जगज्जेते बनविण्यासाठी दिदिएर योजना आखत आहेत. बघूया फ्रान्स-बेल्जियम या तुल्यबळ संघांमध्ये कोण बाजी मारतो ते.