
सामना प्रतिनिधी । नेवासा
दरोड्याच्या तयारीत असलेल्या श्रीरामपूर येथील पाच जणांना नेवासा पोलिसांनी खडका-सलाबतपूर रस्त्यावर गुरूवारी पहाटे पकडल्याने तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. या पाच जणांना नेवासा न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीसांनी १०लाखांचा गाडीसह ऐवज जप्त केला आहे.
सुजित भीकन देवकुळे (वय-२६ रा. हरेगाव रोड, श्रीरामपूर), संदिप एकनाथ ढगे (वय२६ रा. खोकर ता. श्रीरामपूर), रोहन विलास शिंदे (वय २५ रा. चाळीसगाव), अभिजित मधुकर जोंधळे (वय २५ रा. श्रीरामपूर), दिपक बाबासाहेब शेटे (वय २३ रा. श्रीरामपूर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
गुरूवारी पहाटे ३ च्या दरम्यान चार ते पाच तरूण इनोव्हा गाडीसह खडका-सलाबतपूर रस्त्यावर संशयास्पद फिरत असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार तातडीने पोलीस उपनिरिक्षक प्रमोद भिंगारे, पोलीस कर्मचारी बाबासाहेब लबडे, विठ्ठल गायकवाड, तुळशीराम गिते, सुहास गायकवाड, महेश कचे, संभाजी गर्जे, संदिप म्हस्के, अंबादास गिते यांनी इनोव्हा गाडी(एमएच.०५ बी. एस. ४७१६)सह या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून दरोड्यासाठी लागणारे साहित्य चॉपर, बनावट नंबर प्लेट, सात सुतळी अॅटमबॉम्ब, लाकडी दांडके, लोखंडी रॉड, दो-या, डिझेल ड्रम आदी साहीत्यासह रोख रक्कम असा दहा लाखाचा ऐवज सापडला आहे.

























































