धुळ्यात कचरा कुजला, डबकी झाल्याने डासांचे प्रमाण वाढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । धुळे

शहरातील नटराज चित्रमंदिर परिसरातील सार्वजनिक स्वच्छतेसाठी नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा नेला होता. पण परिस्थितीत बदल झालेला नाही. नटराज चित्रमंदिरासमोरील खुल्या जागेत कचरा कुजला आहे. रिमझिम पावसामुळे डबकी निर्माण झाली आहेत. डासांचा उपद्रव वाढला आहे. स्वच्छ भारत अभियानाचा नारा देणाऱ्या महापालिकेच्या क्षेत्रातच मोठ्या प्रमाणात कचरा आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिका प्रशासनाचा कारभार हा बेबंद पध्दतीने सुरू आहे, असे म्हणत आता नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

शहरातील नटराज चित्रमंदिराच्या समोर खुली जागा आहे. या जागेवर कचरा साचला आहे. विशेष म्हणजे या जागेजवळच सकाळी अनेक जण चाराविक्रीसाठी येतात. काहीजण पुण्य मिळविण्यासाठी याच भागात मोकाट जनावरांना हिरवा चारा घालतात. चारा खाल्ल्यानंतर काही भाग तसाच पडून राहतो. तो या खुल्या जागेत येऊन पडतो. शिवाय इतरही काडीकचरा या खुल्या जागेत येतो. सद्या भुरभुरता पाऊस होत असल्याने खुल्या जागेच्या उंचसखल भागात कचरा कुजू लागला आहे. डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती झाली आहे. नटराज चित्रमंदिर परिसरातील नागरिक आजारी पडू लागले आहेत.  या भागातील कचऱ्याची विल्हेवाट लावली नाही तर साथीचे आजार पसरतील. महापालिका प्रशासनाने प्रामाणिकपणे काम करावे. नागरिकांच्या जिवाशी खेळ करू नये. तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने महापालिकेचा कारभार हा बेबंद पध्दतीने सुरू आहे, असे म्हणत नागरिकांनी संताप व्यक्त केला.

आश्वासनांवर बोळवण
महापालिकेकडे अनेकदा तक्रारी केल्या. मध्यंतरी महिला-पुरुषांचा मोर्चाही महापालिकेवर धडकला होता. त्या वेळी आश्वासने देऊन नागरिकांना माघारी पाठविण्यात आले होते. पण आता पुन्हा परिस्थिती बिकट झाली आहे.