
सामना प्रतिनिधी । बोरी
लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे नाहीच, अशी भूमिका घेतलेल्या मराठा आरक्षण ठोक मोर्चाने शुक्रवारी हिंसक वळण घेतले होते. परळीच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी गावागावातून मराठा बांधवांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. दिवसभरात अनेक ठिकाणी आंदोलने झाली होती. बोरी येथे शुक्रवारी सायंकाळी जिंतूर-परभणी महामार्गावर चार बसवर दगडफेक करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना शनिवारी अटक केली.
शुक्रवारी सायंकाळी जिंतूर-परभणी महामार्गावर चार बसवर दगडफेक करण्यात आली होती. याप्रकरणी बस चालक संदीप घुले यांच्या फिर्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांनी तात्काळ तपास करून तिघांना ताब्यात घेतले. अटकेमध्ये बोरी येथील पवन विलास चौधरी व वर्णे येथील अजिंक्य भोसले, कसर येथील स्वप्नील मगर यांचा समावेश आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक व्हि.एस. खोले, जमादार व्हि.एम. गिरी, पोकॉ. सुनील गिरी हे करत आहेत.





























































