
सामना प्रतिनिधी । नांदेड
चेन्नई-नगरसोल एक्सप्रेसमधून चोरट्यांनी ४ लाख २४ हजारांचा ऐवज असलेली एक बॅग चोरुन नेल्याची घटना सोमवारी सकाळी पाच वाजता घडली. सोमवारी सकाळी गाडी क्र.१६००३ ही चैन्नई ते नगरसोल जाणारी गाडी नांदेडकडे येत असताना शयनयान डब्ब क्र.एस-९ मध्ये प्रिया मुकेश ओसवाल (रा.जालना) हे आपल्या कुटुंबासह प्रवास करत होत्या. त्यांना जालना येथे जायचे होते. रेल्वेतील ५६ क्रमांकाच्या बर्थवर प्रिया ओसवाल झोपल्या होत्या. त्यांच्या डोक्याजवळ ठेवलेली एक बॅग चोरट्यांनी चोरुन नेली. चालत्या गाडीतून उडी मारून चोरटे पळून गेले.
प्रिया ओसवालच्या बॅगेमध्ये तीन लाख रुपये रोख रक्कम आणि सोन्या, चांदीचे दागिणे मिळून एकूण ४ लाख २४ हजाराचा ऐवज होता. सोबतच त्या बॅगमध्ये काही एटीएम कार्ड, डेबीट कार्ड आणि मोबाईल पण होते. त्यांना जाग आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी नांदेड स्थानकावर रेल्वे पोलिसांशी संपर्क केला. रेल्वे पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील धुतराज या करीत आहेत.
रेल्वे स्थानक मुदखेड येथे सीसीटिव्ही कॅमेरे नसल्याची बाब सांगण्यात आली. रात्री धावणाऱ्या प्रत्येक गाडीमध्ये रेल्वे सुरक्षा दलाचे जवान सशस्त्रपणे वावरत असतात तरी हा लुटीचा प्रकार घडला आहे. रेल्वे प्रवाशांची सुरक्षितता या घटनेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.



























































