मराठा आरक्षण : फडणवीस सरकार गेंड्याच्या कातडीचे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । राहुरी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेले काकासाहेब शिंदेचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. हे स्पष्ट करत आरक्षणाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणारे देवेंद्र फडणवीस सरकार गेंड्याच्या कातडीचे असल्याचा आरोप शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी केला.

मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यात राज्य शासनाची सुरू असलेली चालढकल, त्यातच या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनात सोमवारी गोदावरी नदीत काकासाहेब शिंदे या तरुणाचा बळी गेल्याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनाला पाठींबा म्हणुन आज मंगळवारी शिवसेना, मराठा एकीकरण, छावा संघटनेच्या वतीने राहुरी तालुका बंदची हाक देण्यात आली होती. राहुरीच्या बाजार पेठेतील व्यावसायिकांनी स्वयंस्फुर्तीने व्यवहार बंद ठेवले होते. मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी शहरातुन फेरी काढुन शिवाजी चौकात निषेध सभा घेतली. या सभेत शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काकासाहेब शिंदे या मराठा तरूणाचा बळी गेल्याने संपुर्ण महाराष्ट्राला दुख झाले असुन शिंदेचे बलिदान हे शेवटचे असणार आहे. कुणीही जीव देऊ नये, या उलट शासनाला जीव देण्यास भाग पाडू. शिवसेना सत्तेत असली तरी या पक्षाची प्रथम जनतेशी बांधीलकी आहे. जो पर्यंत आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत शिवसेना तुमच्या बरोबर राहणार आहे. शासनाने आरक्षणाबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी, अन्यथा आंदोलनाची व्याप्ती तीव्र केली जाईल, असा इशारा रावसाहेब खेवरे यांनी दिला.

छावा संघटनेचे देवेंद्र लांबे म्हणाले की, मराठा आरक्षणाची मागणी शांततेच्या मार्गाने सुरू आहे. मात्र सरकार या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. मंगळवारी झालेल्या आंदोलना दरम्यान गेलेला काकासाहेब शिंदे यांचा ५७ वा बळी आहे. तरी देखील सरकार कडुन दखल घेण्यात आलेली नाही. आंदोलनाची पुर्व कल्पना जिल्हाधिकारी यांना देण्यात आली होती.माञ पुरेसा बंदोबस्त देण्यात आलेला नव्हता तलाठ्याच्या भरवशावर आंदोलनाची जबाबदारी ढकलण्यात आल्याने शिंदेचा बळी गेला.

गोदावरी नदीच्या पुलावर आंदोलन सुरू असताना पाण्यात उडी घेतलेल्या तरूणास वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या युवकांना मज्जाव करण्यात आला. नदीपात्रात जीवरक्षक बोटी व नावाडी ठेवण्यात आले नसल्याने काकासाहेब शिंदेचा नाहक बळी गेला. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, ही मागणी लांबे यांनी केली.

अरूण वाबळे म्हणाले की, मंगळवारच्या आंदोलना दरम्यान बळी गेलेला काकासाहेब हा शहीद झालेला आहे. शहीदाच्या व्याख्येप्रमाणे शासनाने शिंदेच्या कुटुंबाला मदत करावी. मराठ्यांचे आंदोलन हे सुनामीचे पूर्व लक्षण असून ही सुनामी आली तर मराठ्यांच्या तरूणांचा बळी न जाता येणाऱ्या सुनामीत मुख्यमंत्र्यांचा बळी जाईल, असा इशारा वाबळे यांनी दिला.

मराठा आंदोलनाची व्याप्ती लक्षात घेता आंदोलन दडपण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेगा भरती दरम्यान १६ टक्के भरती राखून ठेवण्याचे गाजर दाखविले आहे. राज्याचे भाजपा सरकार मागण्यांची  सोडवणूक करण्याऐवजी गाजर दाखविणारे सरकार असल्याचे मच्छिंद्र गुंड व राजेंद्र खोजे यांनी म्हटले.

या निषेध सभेत गणेश खेवरे,डॉ. संजय म्हसे, अशोक खेवरे, पोपट शिरसाठ, विक्रम मोढे, राजेंद्र लबडे, राजेंद्र भोरे, संतोष वाघमारे, अशोक कल्हापुरे, सचिन क्षीरसागर,रमेश कोकाटे सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते. आजच्या बंदमध्ये अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, उपनिरीक्षक लक्ष्मण भोसले, उपनिरीक्षक सतीश शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली शहर तसेच नगर मनमाड राज्य मार्गावर पोलीसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.