बारावी पेपरच्या फेरतपासणीत प्राची पड्ये कला शाखेत जिल्ह्यात प्रथम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संगमेश्वर

बारावीच्या परीक्षेत संगमेश्वर तालुक्यातून प्रथम आल्याचे जाहीर झालेली प्राची सिताराम पड्ये ही प्रत्यक्षात तालुक्यातून नव्हे तर जिल्ह्यातून प्रथम आली आहे. जबरदस्त आत्मविश्वास असल्यानेच तिने आपल्या पेपरची फेरतपासणी करुन घेतली आणि बारावी कला शाखेत ती जिल्ह्यात प्रथम आल्याचे स्पष्ट झाले आहे. सुट्टीच्या दिवशी आपल्या आई वडिलांना मदत करुन परिस्थितीवर मात करत मोठ्या जिद्दीने एका दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनीने मिळवलेले हे यश कौतुकास्पद असून अनेक मुलांसाठी आदर्शवत असे आहे.

संगमेश्वर तालुक्यातील लोवले गावातील तसेच बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्था कला – वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची प्राची ही विद्यार्थीनी आहे. ती एका सामान्य कुटूंबात जन्मली असून तीचे वडिल सिताराम पड्ये हे घरगुती मिसळवाले म्हणून प्रसिद्ध आहेत. प्राची ही वडिलांना लहानपणापासूनच मदत करत आली आहे. तीला आणखी दोन बहिणी असून या परिवाराचा उदरनिर्वाह वडापावच्या व्यवसायावरच अवलंबून आहे. प्राचीने आपली परिस्थिती लक्षात घेऊन जिद्दीने उत्तम गुणांचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून दहावी आणि आता बारावी परीक्षेत अभ्यास केला. तीने शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत येण्याचा मान मिळवला होता. दहावी परीक्षेत ९४ टक्के गुण मिळवून विद्यालयात तृतीय क्रमांक पटकावला होता.

यावर्षी प्राचीने बारावी कला शाखेमध्ये ९०:१५ टक्के गुण प्राप्त केले होते. यामुळे ती तालुक्यात कला शाखेत प्रथम आली होती. मात्र आपल्याला मिळालेले गुण कमी आहेत यावर ती ठाम असल्याने तीने आपल्या पेपरची फेरतपासणी करण्याची मागणी केली होती. यात प्राचीला अर्थशास्त्र विषयात ५ गूण वाढले असून तीची टक्केवारी ९०:९२ एवढी झाली आहे. या वाढलेल्या गुणांमुळे प्राची बारावी परीक्षेत तालुक्याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम आल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्राचीला व्हायचेय प्रशासकीय अधिकारी
बुरंबी शिवने सारख्या ग्रामीण भागात शिकलेली प्राची ही आता पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात पुढील शिक्षण घेत आहे. तीने उच्चपदस्थ अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. यासाठीच तीने कला शाखेतून शिक्षण घेण्याचा पर्याय निवडला आहे.