
प्रवाशांना कोणतेही कारणे न देता वारंवार होणारी उड्डाणे रद्द करणे, उशिराने उड्डाण करणे आणि प्रवाशांची गैरसोय केल्याप्रकरणी स्पाइसजेटला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने अखेर कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. स्पासइजेटने पुढील सात दिवसांत या नोटिसीला उत्तर द्यावे, असे निर्देशेही या नोटिसीतून देण्यात आले आहेत.
एअरलाइनने परदेशांसाठी नियमित उड्डाणे चालवण्यासाठी आवश्यक नियमांचे पालन केले नाही. स्पाइसजेटची वेळेवर उड्डाणे करण्याची कामगिरी सातत्याने घसरत आहे. विमानांच्या उड्डाणांना होणारा विलंब आणि ती रद्द होण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. विमानांची उड्डाणे रद्द होणे आणि विलंबामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. एअरलाइन त्यांच्या मदतीसाठी पुरेशी व्यवस्था करत नाही. दंडाची रक्कम स्पाइसजेटने अनेकदा आठवण करून देऊनही भरली नाही. परदेशी विमान वाहतूक संस्थांनी स्पाइसजेटच्या उड्डाणांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सेवा देणाऱ्या कंपन्यांना वेळेवर पैसे न दिल्याबाबत या तक्रारी आहेत.
























































