राहुल यांची ‘जादू की झप्पी’ पूर्वनियोजितच!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन ।नवी दिल्ली

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधीतील अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेतील भाषण संपवल्यावर अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळ जाऊन त्यांना ‘जादू की झप्पी’ दिली होती. राहुल यांनी अचानक केलेल्या या कृतीमुळे देशभरात अनेक तर्कवितर्क काढण्यात येत होते. आपल्या मनात द्वेष नसल्याचे दाखवण्यासाठीच राहुल यांनी मोदींना उत्फूर्तपणे ‘जादू की झप्पी’ दिल्याची चर्चा रंगली होती. मात्र, राहुल यांची ही कृती उत्स्त्फूर्त नसल्याचे समोर आले आहे. मोदींना ‘जादू की झप्पी’ देण्याचे फेब्रुवारीमध्येच ठरले होते. त्यासाठी राहुल योग्य संधीची वाट बघत होते. ती संधी त्यांना अविश्वास प्रस्तावावरील चर्चेच्या निमित्ताने मिळाली,असे सूत्रांनी सांगितले.

अविश्वास प्रस्तावावर भाषण करताना राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना मिठी मारली होती. त्यांच्या या कृतीने संसद अवाक झाली. राहुल यांच्या या कृतीने काँग्रेसचे नेते आणि खासदारही गोंधळले होते. मात्र या कृतीत उत्स्फूर्तता नसून ही मिठी पूर्वनियोजित होती, असे काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले. फेब्रुवारीमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेळी मोदींनी काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप केला होता. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावरही मोदींनी टीका केली होती. मोदी नेहरु -गांधी द्वेषाने पछाडलेले असल्याचे दिसून आल्यामुळेच त्यांना एक जादू की झप्पी दिली पाहिजे, असा विचार राहुलच्या मनात त्यावेळी आला होता,’ असेही या नेत्याने सांगितले. विचारधारा आणि पक्ष वेगवेगळे असले तरी कोणताही द्वेष न बाळगता प्रेमाने राहता येते, हे दाखवण्यासाठीच राहुल यांनी ही कृती केल्याचे या नेत्याने सांगितले. मोदींना झप्पी कधी द्यायची याबाबत राहुल विचार करत होते. भाषण मध्येच थांबवून मोदींना झप्पी दिली असती आणि नंतर भाषण पूर्ण केले असते तर ते योग्य ठरले नसते. त्यामुळे भाषण पूर्ण केल्यावर मोदींना झप्पी देण्याचे त्यांनी ठरवले होते. याबाबत त्यांनी पक्षातील काही मोजक्याच नेत्यांशी चर्चा केल्याचेही त्या नेत्याने सांगितले. मोदींना मिठी मारल्यानंतर काँग्रेसच्या सहकाऱ्याला डोळा मारणे हे मात्र पूर्वनियोजित नसल्याचेही नेत्याने स्पष्ट केले.