शिवसेनाप्रमुखांचे स्मारक भाईंदरमध्ये साकारणार राज्य शासनाची मंजुरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । भाईंदर

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट उलगडून दाखविणारे सांस्कृतिक भवन आणि कलादालन भाईंदरमध्ये उभारण्यात यावे यासाठी शिवसेना करत असलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. राज्य शासनाने शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाला मंजुरी दिली असून पुढील महिन्यातच या कामांच्या निविदा काढण्यात येणार आहेत. या कलादालनात शिवसेनाप्रमुखांची भाषणे, त्यांचे फोटो, त्यांनी काढलेली व्यंगचित्रे यासह त्यांचा जीवनपट उलगडून दाखविण्यात येणार आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मीरा-भाईंदर शहरात भव्यदिव्य स्मारक उभे राहावे यासाठी आमदार प्रताप सरनाईक राज्य शासन आणि पालिका प्रशासन यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करत होते. त्याला यश आले असून राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने ६ जून २०१८ रोजी पालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांना याबाबत आदेश जारी केले आहेत. पालिकेच्या मंजूर विकास योजनेत भाईंदर पूर्व येथील आरक्षण क्रमांक १२२ खेळाचे मैदान आणि सामाजिक वनीकरणासाठी राखीव आहे. याचे आरक्षण क्षेत्र ४६.७०० चौरस मीटर एवढे असून यातील ३०,५३३.६० चौरस मीटर एवढी जागा पालिकेच्या ताब्यात आली आहे. याच जागेतील ४५८.००४ एवढय़ा जागेवर तळमजला अधिक पहिला मजला हे स्मारक उभारण्यात यावे, असे यात स्पष्ट केले आहे.