
सामना प्रतिनिधी । पंढरपूर
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार भारत भालके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. मराठा, धनगर, महादेव कोळी आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यास शासन चालढकल असल्याने, या वंचित समाजाला लोकप्रतिनिधी म्हणून आपण न्याय देऊ शकत नसेल तर त्या पदावर राहण्यात आपल्याला सारस्य नाही असे स्पष्टीकरण देत आ.भालके यांनी विधानसभा अध्यक्षांकडे मेलद्वारे पत्र धाडले आहे.
आ. भालके यांनी वरील चारही समाजातील लोकांशी संवाद साधून आपण राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मराठा, धनगर, महादेव कोळी आणि मुस्लिम या समाजाला आरक्षण द्या अशी आपण विधानसभेत सातत्याने मागणी केली आहे. आपल्या मागणीवर शासनाने आरक्षण देण्याचे सभागृहामध्ये आश्वासन दिले आहे पण त्याची अंमलबाजवणी केली जात नाही.
आरक्षण रखडल्याने या चारही समाजात शासनाबद्दल तीव्र नाराजी आहे. त्याचे पडसाद गेल्या काही दिवसापासून राज्यात उमटू लागले आहेत. कायदा हातात घेऊन सर्वसामान्य लोकांना त्रास देण्यापेक्षा शासनाचे नाक दाबायला हवे त्याशिवाय सत्ताधारी मंडळी तोंड उघडणार नाहीत. आंदोलन करून लोकांना त्रास देण्यापेक्षा सरकारला आणि सरकार मधील मंत्र्यांना त्रास द्यायला हवा अशी रोखठोख भूमिका आ. भालके यांनी मांडली.
आषाढी एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांना करू देणार नाही अशी भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली होती. या भूमिकेला आ. भालके यांनी सर्व प्रथम उघड पाठींबा दिला होता. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्र्यांना इशारा देणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पहिल्यांदा मला अटक करा मग कार्यकर्त्यांना अटक करा अशी भूमिका घेत भालके यांनी अटक केलेल्या आंदोलकांची पोलिसांच्या कचाट्यातून सोडवून केली होती. यापुढे आपण वंचित समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलनात सहभागी होणार असल्याचे भालके यांनी स्पष्ट केले.
शिंदे कुटूंबाला १ लाखाची मदत …
मराठा आरक्षणावर आंदोलन करताना पाण्यात बुडून मयत झालेल्या संभाजीनगर येथील काकासाहेब शिंदे यांच्या कुटूंबांची भेट घेऊन भालके यांनी सांत्वन केले व त्यांच्या नातेवाईकांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली.



























































