
सामना प्रतिनिधी । मुंबई
न्यायालयाच्या निर्णयामुळे लांबणीवर पडलेली अकरावी ऑनलाइन प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी आता ३१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता जाहीर होणार आहे. या यादीनुसार प्रवेश घेण्यासाठी २ ऑगस्ट सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुदत आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी अल्पसंख्याक कोटय़ातील रिक्त जागा ऑनलाइनमधून वगळण्याचा निर्णय मागे घेत या जागा ऑनलाइन प्रवेशासाठी उपलब्ध करून देण्याचे नव्याने आदेश दिले. त्यामुळे कोटय़ातील रिक्त जागा ऑनलाइनमध्ये समाविष्ट करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना पुनःअर्ज करण्यासाठी मुदत वाढवून देण्यात आली आहे. तिसऱ्या यादीसाठी विद्यार्थ्यांनी नव्याने अर्ज करायचे असून अर्ज करण्यासाठी २७ व २८ जुलै सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुदत आहे. तसेच उद्या शुक्रवारी तिसऱ्या यादीसाठी उपलब्ध जागा जाहीर होणार आहेत.
११ ऑगस्टपर्यंत प्रवेश प्रक्रिया
न्यायालयाच्या निर्णयामुळे तिसऱ्यांदा अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक कोलमडले. गुणवत्ता याद्या पुढे ढकलण्यात आल्या त्यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रियाही रखडली असून आता नव्या वेळापत्रकानुसार ११ ऑगस्टपर्यंत प्रवेश सुरू राहणार आहेत. ३ ऑगस्टला सकाळी ११ वाजता तिसऱ्या यादीनंतरचा कटऑफ आणि रिक्त जागांचा तपशील जाहीर होणार असून ४ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना शेवटच्या यादीसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. त्यानंतर ७ ऑगस्टला शेवटची गुणवत्ता यादी जाहीर होईल. शेवटच्या यादीनुसार प्रवेश घेण्यासाठी ९ ऑगस्टपर्यंत मुदत असून १० आणि ११ ऑगस्टला कॉलेजस्तरावर होणारे बायफोकल शाखेच्या प्रवेशाची नोंद ऑनलाइन प्रवेशाच्या वेबसाईटवर करायची आहे.



























































