
सामना ऑनलाईन । सिंदखेड राजा
बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील सावखेड तेजन गावात रविवारी एका ३५ वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. गजानन अर्जुन जायभाये असं या शेतकऱ्याचं नाव आहे. अल्पभूधारक असलेल्या जायभाये यांनी स्वतःची चिता रचली आणि विष प्राशन करून स्वतःला जाळून घेतलं. जायभाये यांच्या पश्चात पत्नी आणि पाच वर्षांचा मुलगा आहे.
२९ जुलै रोजी सकाळीच गजानन शेतात गेले होते. औषध फवारणी करण्यासाठी विषारी किटकनाशक आणि स्प्रेसाठी रॉकेल स्वतःसोबत ते घेऊन गेले होते. फवारणी करण्याअगोदर शेतातील लाकडे गोळा करून त्यांनी सरण रचलं. सोबत आणलेल्या विषारी कीटकनाशकाचं प्राथन करून त्यांनी स्वतःला त्या सरणावर जाळून घेत आत्महत्या केली.
जायभाये यांच्याकडे तीन एकर शेती होती. पण त्यांनी कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे आत्महत्या केल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. जायभायेंवर महाराष्ट्र बँकेचे ७० हजार रुपयांचे पीक कर्ज होते. कर्जमाफीच्या गोंधळामुळे त्याला पुन्हा कर्ज मिळू शकले नाही. तरीही त्याने उधार घेऊन पेरणी केली होती. पावसाने दिलेली ओढ, सततची नापिकी आणि डोक्यावर कर्जाचा भार यांमुळे त्यांना उदरनिर्वाह करणं कठीण झालं होतं. सिंदखेड राजा पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.


























































